

Marathwada Politics News: मराठवाडा पदवीधर आणि मराठवाडा शिक्षक हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीने गेल्या तीन दशकांपासून आपल्याकडे कायम राखले आहेत. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात सुरुवातीच्या काळात मराठवाडा शिक्षक संघाचे वर्चस्व होते. २००४ नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात आपले वर्चस्व निर्माण केले. या सत्तांतरात दिवंगत वसंत काळे आणि त्यानंतर त्यांचे पुत्र विक्रम काळे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. विक्रम काळे हे सलग चार टर्म म्हणजे चोवीस वर्षापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
मराठवाडा पदवीधरचे आमदार म्हणून सतीश चव्हाण आणि मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार म्हणून विक्रम काळे यांची जोडी विधान परिषदेत नेहमी चर्चेत असायची. या दोन्ही मतदारसंघावर जणू राष्ट्रवादी पर्यायाने या दोन नेत्यांची मक्तेदारीच होती. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या २०२६ मध्ये झालेल्या निवडणुकीचा आजच्या निकालाने सतीश चव्हाण यांची मक्तेदारी मोडीत निघाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या खेळीने डाॅ. प्रतापसिंह पाटील यांनी सतीश चव्हाण यांचा पराभव करण्याचा भीम पराक्रम केला आहे. सतीश चव्हाण यांच्या पराभवानंतर सोशल मिडियावर 'पदवीधर झाकी है, शिक्षक अभी बाकी है’ अशा पोस्ट फिरू लागल्या आहेत. २०२९ मध्ये होणाऱ्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघातही असाच धक्कादायक निकाल लावण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आतापासूनच तयारीला लागल्याचे यावरून दिसून येत आहे.
चार टर्म सलग या मतदारसंघाचे आमदार राहूनही विक्रम काळे यांचा किंवा मराठवाडा पदवीधरमध्ये सलग तीन टर्म जिंकूनही सतीश चव्हाण यांचा कधी मंत्रीमंडळामध्ये समावेशासाठी विचार झाला नाही. विक्रम काळे यांनी प्रत्येक निवडणूक प्रचारात आपल्या मनातील ही सल अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्यासमोर बोलून दाखवली होती. आमच्या पैकी कोणालाही मंत्री करा, अशी मागणीही काळे यांनी अनेकदा केल्याचे दिसून आले होते. पहिल्यांदाच आमदार झालेल्या उमरग्याचे संजय बनसोडे यांना राज्यमंत्री पदाची लाॅटरी लागली होती. विक्रम काळे, सतीश चव्हाण यांना कायम त्यांचा हेवा वाटत होता.
मराठवाडा पदवीधरच्या धक्कादायक निकालानंतर प्रतापसिंह पाटील यांच्या समर्थकांनी धाराशीवमध्ये जल्लोष करताना मराठवाडा पदवीधर तो झाकी है, शिक्षक अभी बाकी है, ही घोषणा दिल्याने आमदार विक्रम काळे यांचे टेन्शन वाढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धाराशिवमध्ये जल्लोष केला. धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत घोषणाबाजी केली. यावेळी ‘पदवीधर झाकी है, शिक्षक अभी बाकी है’ अशी घोषणा देत आगामी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीही पक्षाने आत्तापासूनच तयारीचे संकेत दिले.
मराठवाड्यातील मतदारांचा शरद पवारांवरील विश्वास कायम असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या मुद्द्यापासून या भागातील जनतेचे शरद पवारांशी भावनिक नाते जोडले गेले असून, पवारांनी उमेदवारी दिलेला उमेदवार विजयी होतो, अशी प्रतिक्रियाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. पदवीधर मतदारसंघातील निकालाच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकडेही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे लक्ष लागल्याचे या घोषणांमधून स्पष्ट होत आहे.
मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून विक्रम काळे हे २०२३ मध्ये सलग चौथ्यांदा विधान परिषदेवर निवडून आले होते. त्यांचा मागील विजय २ फेब्रुवारी २०२३ रोजी जाहीर झाला होता. ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान झाले आणि २ फेब्रुवारी २०२३ रोजी निकाल जाहीर झाला. विक्रम काळे हे सलग चार वेळा निवडून आले आहेत आणि त्यांचा विद्यमान कार्यकाळ फेब्रुवारी २०२९ मध्ये संपणार आहे. त्यामुळे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची पुढील नियमित निवडणूक २०२९ मध्ये अपेक्षित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.