

Parbhani DCC Bank : परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी चौदा वर्षानंतर माजी आमदार तथा विद्यमान संचालक रामप्रसाद बोर्डीकर यांची घरवापसी झाली आहे. महायुतीने 21 पैकी 17 जागा जिंकत बाजी मारली. माजी मंत्री सुरेश वरपूडकर- रामप्रसाद बोर्डीकर हे जिल्हा बँकेतील कायम एकमेकांचे विरोधक सोमवारी (ता.3 ऑगस्ट) एकाच पक्षात असल्याने अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पडद्यामागून केलेल्या हालचालीनंतर रामप्रसाद बोर्डीकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी सुरेश वरपूडकरांच्या नावाची चर्चा सुरू असताना अचानक बोर्डीकरांनी बाजी कशी मारली? यावर खल सुरू असतानाच मेघना बोर्डीकर यांच्या व्हाॅट्सअप स्टेटसची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
'सगळ्याच शर्यतीत भाग घ्यायचा नसतो; काही शर्यती शांत बसून जिंकायच्या असतात', अशा ओळींनी अनेकांच्या भुंवया उंचावल्या गेल्या आहेत. या निमित्ताने बोर्डीकर-वरपूडकर एकाच पक्षात असले तरी त्यांच्यातील राजकीय संघर्ष कायम आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सुरेश वरपूडकरांनी अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार घेतली, की त्यांना घ्यायला लावली? याचीही जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे.
रामप्रसाद बोर्डीकर यांनी यापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून रामप्रसाद बोर्डीकर यांचे खऱ्या अर्थाने राजकीय पुनरागमन झाल्याचे मानले जाते. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे यात मोठे योगदान ठरले आहे.
या पार्श्वभूमीवर मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमधील 'सगळ्याच शर्यतीत भाग घ्यायचा नसतो, काही शर्यती शांत बसून जिंकायच्या असतात', या ओळींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संयम, योग्य वेळेची प्रतीक्षा आणि निर्णायक विजयाचा संदेश देणारे हे स्टेटस आजच्या घडामोडींशी जोडले जात आहे. परभणीच्या राजकारणात याची जोरदार चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.