

Beed News : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्यासह इतर आरोपी बीडच्या कारागृहात आहेत. मकोका अंतर्गत कराड याच्यासह इतर आठ आरोपींवर गुन्हा दाखल असून विशेष न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. बीडच्या कारागृहात वाल्मीक कराड याला व त्याच्या साथीदारांना व्हीआयपी ट्रीटमेंट, मोबाईलचा वापर, घरचे जेवण, कारागृहातील कॅन्टीनमधून खाण्या-पिण्याच्या वस्तू पुरवल्या जातात, असे आरोप वारंवार करण्यात आले. वाल्मीक कराड बीड कारागृहात कैद असला तरी तो तिथून आपली टोळी चालवत असल्याचाही आरोप करण्यात आला.
कारागृहात कराड आणि त्याच्या साथीदारांची प्रचंड दहशत असून, त्याचे गुंड इतर कैद्यांना मारहाण करत असल्याचे काही प्रकार मध्यंतरी समोर आले होते. वाल्मीक कराड याची रवानगी छत्रपती संभाजीनगर किंवा नागपूर कारागृहात करण्यात यावी, अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. मात्र, राजकीय दबावामुळे त्याला इतर कारागृहात हलवण्यात आले नाही, अशीही चर्चा होती. दरम्यान, बीड जिल्ह्यात खून, जीवे मारण्याच्या धमक्या, महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. यातून जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडून जातीयवादाला खतपाणी घालण्याचे प्रकारही सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन वाल्मीक कराड याला बीडच्या कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केल्याची चर्चा आहे. केवळ कराडच नाही, तर त्याच्या इतर सहकाऱ्यांनाही ती दिली जात असल्याचे सोनवणे यांनी शहा यांना दिलेल्या पत्रात म्हटल्याची माहिती आहे. केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक तरुणाचा 20 जून रोजी एका टोळक्याने चाकूहल्ला करत खून केला होता.
या प्रकरणाने जातीय व राजकीय वळण घेतल्याने बीडमधील वातावरण पुन्हा तापले आहे. विशेष म्हणजे, विलास घुले यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी या हत्या प्रकरणातील आरोपींना खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचा हात आहे, त्यानेच आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली, गाडी पुरवली, असा आरोप केला.
तसेच, त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा, या मागणीसाठी आंदोलनही केले. नुकतेच सीबीआयचे पथक या प्रकरणात तपासासाठी केजमध्ये येऊन गेल्याची माहिती आहे. याशिवाय, एसआयटीच्या पथकानेही सौरभ सोनवणे यांची चौकशी केली आहे. पुरवणी जबाबात सौरभ सोनवणे याचे नाव नोंदवण्यात आल्यानंतर यावरून खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे यांच्यामध्ये राजकीय संघर्षाचा भडका उडाला आहे.
या पार्श्वभूमीवर बजरंग सोनवणे यांनी दिल्लीतील आपले वजन वापरून बीड कारागृहात वाल्मीक कराड व इतर कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा मुद्दा थेट देशाच्या गृहमंत्र्यांकडेच नेला. यानंतर दिल्लीहून सूत्रं हलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीड कारागृह प्रशासनही या तक्रारीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी खंडणीला विरोध केल्याने हत्या झाली. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा विश्वासू सहकारी असल्याने त्यांनाही आपले मंत्रीपद गमवावे लागले होते. या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, वाल्मीक कराड, कृष्णा आंधळे, प्रतीक घुले आदी 8 जणांवर मुख्य आरोपी म्हणून मकोका अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापैकी कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे.
दरम्यान, देशमुख कुटुंबीयांनी बीड जेल प्रशासनाकडे लेखी तक्रार देत आरोपींना जेलमध्ये विशेष वागणूक मिळते, असा आरोप करत सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली होती. कुटुंबातील सदस्य दादासाहेब खिंडकर यांनी पोलीस प्रशासनातील लोक आरोपींना मदत करत आहेत, असा दावा केला होता. व्हीआयपी ट्रीटमेंटचे आरोप झाल्यानंतर इतर कैद्यांपासून वाल्मीक कराडला वेगळे ठेवण्यात आले होते. तसेच, त्याची सुरक्षाही वाढवण्यात आली होती. विशेष न्यायालयातील सुनावणीदरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मला आणि नातेवाईकांना फोनवरून केस मागे घेण्यासाठी धमक्या येत आहेत, असा दावा केला होता. सध्या सर्व आरोपी बीडच्या विशेष MCOCA न्यायालयात न्यायालयीन कोठडीत आहेत.
31 मार्च 2025 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास बीड जिल्हा कारागृहात बबन गिते समर्थक महादेव गिते, अक्षय आठवले व त्यांच्या साथीदारांचे वाल्मीक कराड, सुदर्शन घुले यांच्यासोबत नाश्ता करताना वाद झाला होता. नाश्त्याच्या वेळी कैद्यांवरील बंदी उठवण्यात आली होती. त्यावेळी सर्व कैदी बाहेर मोकळे फिरत होते. त्याचवेळी महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मीक कराडच्या अंगावर हात टाकला. मध्ये पडलेल्या सुदर्शन घुलेलाही मारहाण झाली होती.
महादेव गिते आणि अक्षय आठवले यांना वाल्मीक कराडने खोट्या गुन्ह्यात अडकवले असल्याच्या रागातून ही हाणामारी झाल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी तेव्हा केला होता. चुकीच्या पद्धतीने नावे गोवली म्हणूनही मारहाण झाली असावी, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या तक्रारीत वाल्मीक कराडचे नाव नव्हते. तक्रार केवळ सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे यांच्याविरोधात फोन करण्याच्या कारणावरून दाखल झाली होती, असे सांगण्यात आले.
या घटनेनंतर गिते गँगच्या 4 जणांना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात आणि अक्षय आठवले गँगला नाशिक कारागृहात स्थलांतरित करण्यात आले होते. वाल्मीक कराडला मात्र बीडमध्येच ठेवण्यात आले. या प्रकरणात 26 मे 2025 रोजी बीड कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी गंभीर आरोप केला होता की, "वाल्मीक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्यासाठी विशेष चहा, चांगल्या प्रतीच्या चपात्या आणि कँटीनमधून दरमहा 25 हजारांची खरेदी होते." संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनीही आरोपींना जेलमध्ये विशेष वागणूक मिळत असल्याचा आरोप केला होता. तर आमदार सुरेश धस यांनीही कराडला स्वतंत्र जेवण आणि फोनची सेवा मिळत असल्याचा दावा केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.