
औरंगाबाद : गंगापूर-खुल्ताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षक संघटना यांच्यातील संघर्ष टोकाला पोहचला आहे. (Aurangabad) मुख्यालयी न राहता घरभाडे उचलणारे शिक्षक शासनाची फसवणूक तर करतच आहेत, पण आमच्या पिढ्या देखील बरबाद करत आहेत, असा गंभीर आरोप आमदार बंब (Prashant Bamb) यांनी केला होता. शिक्षक संघटनांनी देखील बंब यांच्या आरोपांना जशासतसे उत्तर देण्याची भूमिका घेतल्याने हा संघर्ष अधिकच चिघळत चालला आहे.
शिक्षक संघटना आमदार बंब यांच्या विरोधात मैदानात उतरल्यानंतर मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे शिक्षकांच्या बचावासाठी सरसावले होते. (Teacher) यावरून बंब यांनी आता शिक्षकांच्या चुकीच्या गोष्टींवर पांघरून घालणारे शिक्षक व मराठवाडा मतदारसंघच रद्द करून टाका, अशी खळबळजनक मागणी केली आहे.
आधी विधानसभेत कमी शिकलेले आमदार असायचे. त्यामुळे शिक्षक, प्राध्यपकांचे प्रश्न मांडण्यासाठी या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली होती. आता बहुतांश आमदार हे शिकलेले, सुशिक्षित आहेत. त्यामुळे शिक्षक, मराठावाडा पदवीधर मतदारसंघाची गरज राहिलेली नाही, असा दावा देखील बंब यांनी केला.
बंब यांना शिक्षक संघटनांकडून सुरू असलेले आंदोलन आणि त्यांना शिक्षक आमदारांकडून मिळणारा पाठिंबा या पार्श्वभूमीवर बंब यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी ही खळबळजनक मागणी केली आहे. बंब म्हणाले, शिक्षक, पदवीधर आमदारांची आता गरज राहिलेली नाही. पुर्वी विधानसभेत शिकलेले, पदवीधर, पदव्युत्तर आमदार कमी असायचे म्हणून त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कायदा करून हे मतदारसंघ निर्माण करण्यात आले होते.
आज विधानसभेत शंभर टक्के शिकलेले आमदार आहेत, त्यामुळे आता या मतदारसंघांची गरज नाही. सगळेच नाही पण, बहुतांश शिक्षक, पदवीधर खोटी काम करणारे, खोटी कागदपत्र तयार करणारे, लोकप्रतिनिधींवर दबाव आणण्यासाठी गुन्हे दाखल करणाऱ्या शिक्षकांना पाठिशी घालायचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांची आता गरज नाही, आपण आमदारांची संख्या तितकीच ठेवण्यासाठी अन्य मार्ग काढू शकतो.
सगळे शिक्षक मुख्यालयी राहतात, त्यांना आपल्याच मुलांसमोर शिकवायला संकोच वाटतो, असे मत शिक्षक आमदार व्यक्त करून आमच्या पिढ्या बरबाद करणाऱ्या शिक्षकांना पाठिशी घालत आहेत. एकदा जाऊन पहा ८० टक्के शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत, असा दावा देखील बंब यांनी केला.
बंब यांनी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात शिक्षक, ग्रामसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालयी राहत नाहीत, फुकट घरभाडे घेतात, असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर बंब यांना फोनवरून जाब विचारून अर्वाच्य भाषेत धमक्यांचे प्रकार घडले होते. एका शिक्षक पत्नीविरोधात शिल्लेगाव पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.