औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्यात औरंगाबादेतील १ मे रोजीच्या जाहीर सभेची घोषणा केली. (MNS) त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या सभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ बुक देखील केले, आता प्रतिक्षा आहे ती पोलिसांच्या परवानगीची. त्यामुळे राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेला मैदान तर मिळाले, पण पोलिसांची परवानगी मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Marathwada)
शिवाजीपार्क येथील गुडीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्याला हात घातला आणि राज्यातील वातावरण तापले. रमजानचा महिना सुरू असतांनाच मशिदीवरील भोंगे हटवले नाही, तर आम्ही डबल आवाजात मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू, असा इशारा ठाकरे यांनी या सभेत दिला होता. त्याची अमंलबजावणी देखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक शहरांमध्ये सुरू केली होती.
राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी जोरदार टीका केली, त्यालाही राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेने प्रत्युत्तर दिले. एवढेच नाही तर या सभेत मशिदीवरील भोंग्याबद्दल घेतलेली भूमिका अधिक आक्रमक करत ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम देखील राज्य सरकारला दिला. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले.
त्यात काल पुण्यात राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील जाहीर सभा आणि आयोध्या दौऱ्यांची घोषणा केली. राज ठाकरे यांची औरंगाबादेत तीन वर्षानंतर सभा होत आहे. त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐतिहासिक सभा झालेल्या मराठावाडा सांस्कृतिक मंडळावरच राज यांची ही सभा होणार असून मनसेने हे मैदान आरक्षित देखील केले आहे.
आता पोलिसांची परवानगी मिळवण्यासाठीची कागदोपत्री कारवाई सुरू आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय व त्यासाठी अल्टीमेटम दिल्यानंतर राज्य सरकारच्या हालचाली देखील वाढल्या आहेत. यासाठी नियमावली देखील जाहीर करण्यात येणार असल्याचे गृहमंत्रालयाकडून कळवण्यात आले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मुंबई, ठाणे येथील सभा आणि पुण्यातील महाआरतीने राज्यातील वातावरण बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी सरकारकडून घेतली जात आहे.
राज ठाकरे यांच्या १ मेच्या सभेला परवानगी द्यायची की नाही? यावर देखील खल सुरू आहे. ३ मे रोजी रमजान ईद आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पोलीसांचे प्रयत्न सुरू आहेत. ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळावी, यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर व त्यांचे इतर सहकारी पोलिसांच्या संपर्कात आहेत.
सभेच्या परवानगीसाठी आम्ही पोलिसांकडे अर्ज केला आहे, या प्रक्रियेला वेळ लागतो, त्यामुळे आम्हाला परवानगी मिळेलच, अशी खात्री देखील खांबेकर यांनी सरकारनामाशी बोलतांना व्यक्त केली. अद्याप अर्जावर पोलिसांकडून आम्हाला काही विचारणा झालेली नाही, किंवा बोलावण्यात आले नसले तरी एक-दोन दिवसांत सभेला परवानगी मिळेल, असा विश्वास देखील खांबेकर यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.