Marathwada : एकीकडे हिंगोलीचा खासदार पुन्हा काॅंग्रेसचा निवडून आणण्याचा निर्धार, अशोक चव्हाणांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा संकल्प अन् दुसरीकडे अशोक चव्हाण यांच्यासमोरच गटबाजीचे दर्शन झाल्याने काॅंग्रेसचा मेळावा चांगलाच चर्चेत आला आहे. (Hingoli Congress News) महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपा संदर्भात चर्चा होणार आहे. तत्पुर्वी काॅंग्रेसने हिंगोली मतदारसंघावर दावा सांगत ही जागा निवडून आणण्याचा निर्धार आजच्या आढावा बैठकीत केला.
याच बैठकीत आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांनी मराठवाड्याचे सुपूत्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पाहण्याची इच्छा व्यक्त केली. अशा उत्साहपुर्ण वातावरणात मेळावा संपन्न होत असतांनाच जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांच्यासमोरच थोरात, गोरेगावकर आणि सातव गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घोषणबाजी केली.
हिंगोली (Hingoli) लोकसभा मतदारसंघातून नांदेडचे अशोक चव्हाण समर्थक डाॅ. अंकुश देवसरकर यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. देवसरकर यांचे बॅनर देखील मेळाव्याच्या ठिकाणी लावण्यात आले होते. त्यामुळे संतापलेल्या सातव, थोरात, गोरेगावंकर गटाच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. हिंगोलीत नांदेडचा उमेदवार कशाला? असा सवाल करत तीन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर फाडले.
यावेळी जोरदार घोषणाबाजी झाल्याने वातावरण तापले होते. चव्हाण यांच्याकडे लोकसभा मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चव्हाण हे नांदेडच्या आपल्या समर्थकांची खासदारपदी वर्णी लावू इच्छित असल्याने काॅंग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्याचे पडसाद आजच्या मेळाव्यात उमटले.
प्रकाश थोरात, प्रज्ञा सातव आणि भाऊसाहेब पाटील गोरेगावकर यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत अशोक चव्हाण लादू पाहत असलेल्या उमेदवाराला विरोध दर्शवला. या गटबाजीनंतर आता ठाकरे गटाचा दावा असलेली हिंगोली लोकसभेची जागा ते काॅंग्रेसला सोडणार का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.