Sanjay Raut: BJP त्यांचा गळा कापतेय, तर त्यांच्या गळ्यावर आम्ही कशाला गळा काढू’; कदमांना राऊतांचा टोला
Dharashiv: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही महाराष्ट्रात भाजपसोबत आलो आहोत. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आमचा विश्वासघात करीत केसाने गळा कापू नका, अन्यथा माझेही नाव रामदास कदम आहे, लक्षात ठेवा मीही 25 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात काम करतो आहे,' असा इशारा शिवसेनेचे (Shiv Sena) नेते, माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिला. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निशाणा (Sanjay Raut VS Ramdas kadam) साधला आहे.
रामदास कदमांच्या या इशाऱ्यानंतर सत्ताधारी भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊतांनी उत्तर देणं टाळलं, मात्र रामदास कदम आणि त्यांचे पुत्र सिद्धेश कदम यांच्यावरून त्यांनी राज्यातील महायुतीच्या सरकारवर निशाणा साधला.
‘भाजप त्याचा गळा कापतेय, तर त्यांच्या गळ्यावर आम्ही कशाला गळा काढू’, असे उत्तर राऊतांनी दिले. त्यानंतर रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (Maharashtra Pollution Control Board)अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यावर राऊतांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र डागले. “या सरकारमध्ये सर्वच गोष्टी बेकायदेशीर आणि घटनाबाह्य होत आहेत. त्यामुळे आता ज्या घटनाबाह्य गोष्टी सुरू आहेत, त्यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल,” असे राऊत म्हणाले.
संजय राऊत आज धाराशिव (Dharashiv) दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले, "विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी चोर आणि लफंग्यांना पात्र ठरविलं आहे. घटनेच्या दहाव्या शेड्युलनुसार पक्षांतरबंदी कायद्यानुसार या शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविणं परिहार्य होतं. पण त्या घटनेची पायमल्ली करून नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरविलं. इतकचं नव्हे तर विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर शिवसेना त्यांचीच असा निर्णय देऊन स्वत:च हसं करून घेतलं आहे,"
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच कोकणात राजकीय वातावरण तापलं आहे. उमेदवारीच्या जागावाटपावरून रामदास कदम यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत, अशातच आता दापोलीचे आमदार योगेश कदम यांनीही स्थानिक भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. आपण महायुतीमध्ये समन्वय ठेवून काम करत असताना जर का आमचेच कार्यकर्ते भाजप फोडणार असेल तर मलाही नाईलाजाने वेगळी पावलं उचलावी लागतील, असा सज्जड इशाराच आमदार योगेश कदम यांनी दिला आहे.
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.