Chhatrapati Sambhajinagar News : निदा खान प्रकरण: महापालिकेने बुलडोझर चालवलेल्या घराची एमआयएम नगरसेवकाला हवी नुकसानभरपाई

TCS Conversion Case: नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन निदा खान हिला नगरसेवक मतीन पटेल यांच्या नारेगाव येथील घरातून अटक केली होती. त्यानंतरच महापालिकेने निदा खान हिला ज्या घरातून अटक केली होती, ते घर बेकायदेशीर, बांधकाम परवानगी न घेता बांधले असल्याचे कारण देत त्यावर बुलडोझर फिरवला होता.
Nashik TCS Case; Mateen Patel, Imtiaz Jaleel and Nida Khan
Nashik TCS Case; Mateen Patel, Imtiaz Jaleel and Nida Khansarkarnama
Published on
Updated on

Aimim News : बेकायदा बांधकामावर सात दिवस कारवाई करणार नसल्याच्या आश्वासनाचे पालन न करता छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं तीन मालमत्ता पाडल्या. त्या मालमत्तांची प्रत्येकी 50 लाख रुपये नुकसाभरपाई मिळावी असा दिवाणी अर्ज एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल आणि इतर दोघांनी खंडपीठात दाखल करून मनपा आयुक्त अमोल येडगे आणि अतिक्रमण हटाव विभागाचे अधिकारी संतोष वाहुळे यांना नावानिशी प्रतिवादी करण्याच्या दुरुस्तीची विनंती केली.

यावर शु्क्रवारी (ता. 31) न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांनी दिवाणी अर्ज मंजूर करुन वरील दोघांना नावानिशी प्रतिवादी करण्याची मुभा देत त्यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला. त्यांना 4 आठवड्यात म्हणणे मांडावे लागणार आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील एमआय़एम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल, हनीफ खान आणि सय्यद सरवर यांना महापालिकेने 9 मे 2026 रोजी नोटीस बजावून त्यांच्या नारेगाव परिसरातील बेकायदा बांधकामाबाबत तीन दिवसात खुलासा करण्याचे सूचित केले होते.

तिघांनी खुलासा सादर करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. मनपाने 12 मे रोजी वेळ देण्यास नकार दिला म्हणून तिघांनी सुटीतील न्यायालयापुढे याचिका दाखल केली. त्या याचिकेवर 12 मे रोजी सुनावणी होती, त्याच दिवशी मनपाने दुसरी नोटीस बजावून 24 तासात बांधकाम काढण्याचे आदेश दिले. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली असता, नोटीसची कायदेशीर अंमलबजावणी करू, सात दिवस कारवाई करणार नाही, असे तोंडी आश्वासन वाहुळे यांनी खंडपीठात दिले.

खंडपीठाने याचिकेवर 18 मे रोजी सुनावणी ठेवली . परंतु दिलेले आश्वासन न पाळता मनपाने 13 मे च्या पहाटे पाच वाजता वरील तीन मालमत्ता पाडल्या. यावर तिघांनी ॲड. अभयसिंह भोसले आणि ॲड. कृष्णा रोडगे यांच्यामार्फत दिवाणी अर्ज दाखल केले. दिलेले आश्वासन पाळले नाही म्हणून वाहुळे यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाईचे आदेश देण्याची विनंती केली आहे.

काय आहे प्रकरण?

एमआयएमचे नारेगाव प्रभागाचे नगरसेवक सय्यद मतीन पटेल यांच्यावर नाशिकच्या टीसीएसमधील जबरदस्तीने धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप होता. मतीन पटेल यांच्या नारेगाव येथील घरात निदा खान आपल्या कुटुंबासह अनेक दिवस भाड्याने राहत होती.

नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन निदा खान हिला नगरसेवक मतीन पटेल यांच्या नारेगाव येथील घरातून अटक केली होती. त्यानंतरच महापालिकेने निदा खान हिला ज्या घरातून अटक केली होती, ते घर बेकायदेशीर, बांधकाम परवानगी न घेता बांधले असल्याचे कारण देत त्यावर बुलडोझर फिरवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com