राम काळगे
Nilanga: चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसला घरचा रस्ता दाखवला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. या वेळी त्यांनी विजयाबद्दल सर्व मतदारांचे आभार मानले, तर दुसरीकडे तेलंगणातील जनतेलाही विशेष संदेश दिला. या वेळी त्यांनी आजच्या हॅटट्रिकने 2024 च्या हॅट्ट्रिकची हमी दिल्याचा विश्वास व्यक्त केला.
निलंगा मतदारसंघातील एका कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर व भाजप नेते संभाजीराव पाटील निलंगेकर या दोघांनी एकमेकांवर केलेल्या विधानावरून उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाला.
संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, "निलंगा तालुका हा सुसंस्कृत तालुका आहे. या भागातील व्यापार वाढला पाहिजे, दळणवळणाची सुविधा निर्माण झाली पाहिजे. निलंगा मतदारसंघाच्या सुरक्षिततेसाठी मी स्वतः द्वारपाल म्हणून काम करेन."
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले, "आम्ही वेगवेगळ्या विचाराचे असल्याने अनेकांना प्रश्न पडला असेल की, हे एकाच व्यासपीठावर कसे, परंतु तालुक्याच्या अथवा शहराच्या चांगल्या कामासाठी निश्चितच एकत्र येणे गरजेचे आहे. आज काही राज्यांचे निकाल आले असले तरी त्यामध्ये हाताच्या मदतीशिवाय 'कमळ' कसे फुलणार असा प्रतिप्रश्न करून मतदारसंघाच्या विकासासाठी 'तुम्ही द्वारपाल असाल तर मी चौकीदार' आहे. तिसऱ्या कोणाचा विचारच करायचा कशाला अशी मिश्कील टिप्पणी करताच उपस्थितांत एकच हश्या पिकला.
निलंगा शहर व मतदारसंघाचा विकास होणे गरजेचे आहे. माजी मुख्यमंत्री डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी अनेक पायाभूत सुविधा उभ्या केल्या. छोटेशे खेडे असलेले निलंगा आता मोठे शहर झाले आहे. या शहरात वैद्यकीय महाविद्यालयाची कमतरता आहे. ही कमतरता संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पूर्ण करावी, अशी मागणी करताच उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.