निलंगा ः लातूर जिल्ह्याच्या राजकारणात माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि विद्यमान पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्यातील राजकीय संघर्ष जिल्ह्याला नवा नाही. (Latur) नुकत्याच झालेल्या जिल्हा बॅंक निवडणुकीत तर हा संघर्ष अधिकच उफाळून आला होता. त्यानंतर जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणुकीतही निलंगेकरांनी (Sambhaji Patil Nilangekar) देशमुखांवर जोरदार टीका केल्याचे पहायला मिळाले होते.
असे असले तरी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्याचे नुकसान नको म्हणून निलंगेकर यांनी प्रवेश प्रक्रिये संदर्भात पाठवेल्या एका पत्राची दखल अमित देशमुख यांनी घेतल्याचे दिसून आले आहे. वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी नीट परीक्षा क्रमप्राप्त असून याचा निकाल लागून दीड महिना लोटला आहे. मात्र राज्य शासनाकडून वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु केली नव्हती.
देशातील इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनानेही प्रवेश प्रक्रिया सुरु करून विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत करावी अशी मागणी संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे २४ डिसेंबर रोजी पत्राद्वारे केली होती. निलंगेकर यांच्या पत्राची दखल घेत वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
वैद्यकीय शिक्षणासाठी क्रमप्राप्त असलेल्या नीट परीक्षेचा निकाल दीड महिन्यापुर्वी लागेलेला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाल्याने राज्य शासनाने वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु केलेली नव्हती. या याचिकेवर ६ जानेवारी २०२२ रोजी सुनावणी होणार आहे. याचिका दाखल झालेली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यासह गुणवत्ता यादीची प्रक्रिया पुर्ण करण्यास स्थगिती दिलेली नाही.
ही बाब निलंगेकर यांनी पत्राद्वारे राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. विद्यार्थ्यांचा वेळ वाचण्यासाठी वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु करावी, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली होती. देशातील गुजरात, कर्नाटक, केरळ यासह इतर राज्यांनी प्रवेश प्रक्रिया सुरु केली असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.
त्यानंतर आता वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून यासंदर्भात राज्य सामाईक प्रवेश सेलने नोटिफिकेशन काढलेले आहे. त्यानुसार ३० डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी आणि नोंदणी शुल्क भरता येणार आहे. ३ डिसेंबर ते ६ जानेवारी दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आवश्यक असणारी कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहेत.
तर ८ जानेवारी रोजी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. आता निलंगेकर यांनी पत्राचा हा परिणाम आहे? की मग राज्य सरकारने प्रवेश प्रकिया सुरूच केली होती आणि त्याच दरम्यान हे पत्र आल्यामुळे हा योग जुळून आला अशी देखील चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.