
मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अतिवृष्टीने ग्रासलेल्या बीड जिल्ह्याला विशेष आर्थिक पॅकेज देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. या संदर्भात मुंडे यांनी अजित पवार यांची प्रत्यक्ष भेट देखील घेतली आहे.
बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीने निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीबाबत त्यांनी माहिती दिली व जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी व सामान्य नागरिकांना दिलासा व अर्थसहाय्य देण्याबाबत विनंतीही केली. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित हे देखील उपस्थित होते.
मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, यावर्षी बीड जिल्ह्यात विशेषकरून ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात सरारीपेक्षा तिप्पटी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जून ते आजपर्यंत जिल्ह्यात अकरा वेळा अतिवृष्टी झाली आहे, तर मागील पंधरा दिवसात जिल्ह्यात तीनवेळा ढगफुटी सदृश परिस्थीती आहे आणि पावसाचा जोर अद्यापही विसावलेला नाही.
जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ९७३ मी.मी. पाऊस पडला आहे. मागील १५ दिवसात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणाना सोबत घेऊन तीनवेळा अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची व पूर परिस्थितीची पाहणी केली. जिल्ह्यात पूरपरिस्थिती नियंत्रणात आणणे व अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोचवणे यासाठी सर्व यंत्रणा हाय अलर्टवर ठेवत २४ तास कार्यरत मदत कक्ष स्थापन केला आहे.
जिल्ह्यात सर्वदूर कोसळलेल्या ढगफुटी सदृश अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील गोदावरी, मांजरा, वाण, सिंदफना, बिंदुसरा, कुंडलिका आदी सर्व प्रमुख नद्यांना पूर आला आहे. तसेच मोठे जलप्रकल्प तुडुंब भरल्याने त्यांचे दरवाजे उघडावे लागत आहेत. यामुळे पुढील गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. बीड जिल्ह्यातील मांजरा नदी काठच्या सुमारे २४ गावांमध्ये पाणी शिरले असून काही गावांमधील लोकांना अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले आहे.
पुरात अडकून घरावर, झाडावर आधार घेतलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील दोन गावातील ७७ नागरिकांना सुखरूप वाचविण्यात बचाव पथकांना यश आले, मात्र खूप मोठ्या प्रमाणावर पशुहानी झाली आहे. जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, गेवराई, बीड, वडवणी, धारूर यांसह पाटोदा आदी जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये अतोनात नुकसान व घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यात या दोन महिन्यात पुराच्या पाण्यात वाहून जाऊन १४ जणांचे प्राण गेले आहेत.
६१ मंडळात शेतीचे शंभर टक्के नूकसान
बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ६१ महसुली मंडळांमध्ये शेती पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. नदी काठच्या गावांमध्ये शेतीमध्ये १५ दिवसांपासून पाणी साचलेले आहे व त्यामुळे पिके कुजून गेली आहेत. तर बऱ्याच गावांमध्ये जमिनीतील माती खरडून वाहून गेल्याने पिकाबरोर शेत जमीनीचेही मोठे नुकसान झाले आहे.
बीड जिल्हा प्रशासनाने कृषी, महसूल व भारतीय पीक विमा कंपनी असे मिळून संयुक्त पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू केली, मात्र पुन्हा पुन्हा पाऊस पडत असल्याने पंचनाम्यातील आकडेवारी सतत बदलत आहे. त्यातच भारतीय पीक विमा कंपनी ही एकमेव कंपनी बीड जिल्ह्यातील पिकांना विमा संरक्षण देते व नुकसानीच्या ७२ तासांच्या आत झालेल्या नुकसानीची माहिती कंपनीला ऑनलाईन कळवावी अशी नियमावली आहे.
परंतु अतिवृष्टी क्षेत्रात वीज, इंटरनेट यांनाही मोठ्या प्रमाणात बाधा पोचल्यामुळे तसेच ग्रामीण शेतकऱ्यांमध्ये ऑनलाईन बाबत पुरेसे ज्ञान नसल्यामुळे शेतकऱ्यांना कंपनीच्या नियमावलीचा देखील मोठा जाच सहन करावा लागतो आहे. जिल्ह्यातील बाधित ६१ महसुली मंडळांमध्ये एकूण ७ लाख ७३ हजार हेक्टर लागवड क्षेत्रापैकी ५ लाख २५ हजार हेक्टर शेती अतिवृष्टीने बाधित झाली आहे.
यात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, बाजरी यांसह ऊस फळपिके अशा सर्वच पिकांचे सरसकट नुकसान झाले. यावर्षी शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागण्याचे चिन्ह नाही! जिल्ह्यातील शेतकरी या नैसर्गिक संकटाने खूप मोठ्या संकटात सापडला आहे. कच्ची घरे, पक्की घरे, झोपड्या यांचीही बऱ्याच ठिकाणी मोठी पडझड झाली असून ५०० पेक्षा अधिक दुभती जनावरे वाहून गेली आहेत. विशेषकरून नदीकाठच्या गावांमध्ये आतापर्यंत सुमारे १६७ किमीचे रस्ते तुटून किंवा वाहून गेले आहेत.
तर गेवराई, अंबाजोगाई, परळी सह काही तालुक्यातील पूल तुटले किंवा वाहून गेले अशीही जवळपास १६ उदाहरणे आहेत. महसुली पंचनामे व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील आकडेवारी अभ्यासली असता बीड जिल्ह्यातील ओला दुष्काळ सदृश परिस्थिती किती भीषण व गंभीर आहे, हे लक्षात येईल. या परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी वर्गाला, सर्व सामान्य नागरिकांना धीर, दिलासा व विशेष अर्थसहाय्य देण्याची गरज आहे.
आपले महाविकास आघाडीचे सरकार आपल्या नेतृत्वात बीड जिल्ह्यातील शेतकरी व सामान्य नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, असा मला विश्वास आहे. तरी आपणास नम्र विनंती की या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत बीड जिल्ह्याला विशेष आर्थिक पॅकेज घोषित करून ते तातडीने लागू करण्यात यावे. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी, कष्टकरी व नागरिकांना अर्थसहाय्य देण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी देखील धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.