Aurangabad Political News : यापुर्वी आरबीआयने जेव्हा आदर्श सहकारी बॅंकेवर निर्बंध लादले होते, तेव्हा मी आणि राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी ठेवीदारांना १७८ कोटी रुपये मिळवून दिले होते. (Dr.Karad On Imtiaz Jalil) आदर्श पतसंस्थेतील ठेवीदारांना देखील त्यांच पैसे परत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या प्रकरणात आम्ही लक्ष घातल्यानंतरच अध्यक्ष, संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल होऊन अटकेची कारवाई झाली, असा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी केला.
आदर्श पतसंस्थेच्या माध्यमातून खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) मात्र राजकारण करत आहेत, असा आरोप देखील कराड (Dr.Bhagwat karad) यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. आदर्श पतसंस्थेतील दोनशे कोटींच्या घोटाळ्यात इम्तियाज जलील यांनी सुरुवातीपासून पुढाकार घेत मोठे आंदोलन उभारले होते. मोर्चा काढत पोलिस यंत्रणावर दबाव वाढवल्यामुळे या घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत केली जात असल्याचा दावा इम्तियाज यांनी केला होता.
पतसंस्थेचा अध्यक्ष तथा मुख्य आरोपी अंबादास मानकापे व इतर तीन संचालकांना अटक देखील मोर्चाच्या इशाऱ्यानंतरच झाली, असे देखील इम्तियाज यांनी म्हटले होते. (Scams) या संपुर्ण प्रकरणात इम्तियाज यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, तत्कालीन सहकार मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदीपान भुमरे, अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार, विधान परिषदेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याविरोधात टीकेची झोड उठवली होती.
डाॅ. कराड यांनी आज या सर्व आरोप आणि टीकेला प्रत्युत्तर देतांना इम्तियाज जलील यांच्यावरच राजकारण करत असल्याचा आरोप केला. आदर्श पतसंस्थेत घोटाळा होण्यापुर्वी आदर्श सहकारी बँकेवर आरबीआयने निर्बंध आणले. याची कुणकूण लागताच आम्ही तत्कालीन सहकारमंत्री अतुल सावे, सहकार आयुक्त कवडे, जिल्हा उपनिबंधक यांच्या माध्यमातून २६ जूनला बैठक घेतली. पाच लाख रुपयापर्यंत ज्यांच्या ठेवी होत्या त्यांना डिपॉझिट क्रेडिट स्किममधून १७८ कोटी रुपये परत मिळवून दिले.
आता पतसंस्थेतील ठेवीदारांना देखील पैसे परत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. मात्र खासदार इम्तियाज जलील यात राजकारण करत असून मोर्चा काढून लोकांना भडकावत आहेत. इम्तियाज यांना खरचं ठेवीदारांचा कळवळा असता तर त्यांनी आम्हाला फोन केला असता. इम्तियाज यांनी मोर्चा काढण्याआधीच आम्ही या प्रकरणी प्रक्रिया सुरु केली होती. सहकार आयुक्तांना बोलावून त्यानंतर गुन्हे दाखल करत पुढील कारवाई झाली, असा दावा देखील डाॅ. कराड यांनी केला.
जलील यांनी काय केले. मोर्चा काढून लोकांच्या भावना भडकविण्याचे काम केल्याचा आरोपही कराड यांनी केला. आदर्श पतसंस्थेत ६५ हजार २२९ लोकांच्या ३५६ कोटी ६९ लाख ८२ हजार २५० रुपयांच्या ठेवी आहेत. यात ५० हजार ठेवी असलेले ५१ हजार लोक आहे. प्रशासकांनी १० कोटी वसूल केल्यास ५० हजार ठेवीदारांना पैसे मिळतील. त्यांच्याच माध्यमातून प्रयत्न सुरु असून याकडे केंद्र आणि राज्याचे लक्ष आहे. या संस्थेचे १२ संचालकांपैकी एक मयत आहे. ६ जणांना अटक केली आहे. पाच जण सापडत नाहीत, त्याचा शोध सुरू आहे.
अटक केलेल्या सहा जणांकडील ८५ पैकी ३५ मालमत्तांची ओळख पटली आहे. त्या ३५ मालमत्तांचे बाजारमूल्य १५० कोटी आहे, तर ५० मालमत्ता या संशयित आहेत, असेही कराड यांनी यावेळी सांगितले. अधिवेशनामुळे हे सांगण्यास उशीर झाला. मात्र पतसंस्थेवर आता प्रशासक नेमला आहे. पतसंस्थेतून ज्यांनी मोठे कर्ज घेतले, अशा ग्राहकांना पोलिस आयुक्तालयात बोलावून त्यांची वसुली केली जाईल. विमा संरक्षण देण्याचा आमचा प्रस्ताव होता, मात्र काही पतसंस्थांनी विरोध केला. लोकांचे पैसे परत मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.