Beed Political News: भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याच्या चर्चा अनेकदा राजकीय वर्तुळात सुरू असतात. पंकजा मुंडेंना वारंवार डावललं जात असल्याचा आरोपही त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो. यातच राज्यसभेची उमेदवारी पंकजा मुंडेंना मिळेल अशी चर्चा होती. मात्र, तसं काही झालं नाही. आता आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने पंकजा मुंडे पुन्हा एकदा अॅक्टिव्ह मोडवर आल्या आहेत. आज त्या बीडच्या दौऱ्यावर होत्या. या वेळी पाटोदामधील महासांगवी येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी एकीचं बळ दाखवण्याची वेळ आली असून, प्रत्येकाला संघर्षाला सामोरं जावं लागतं, असं सूचक विधान केलं. (Pankaja Munde Speech)
"राजकारणाचा हा मंच नाही. वडिलांचे शब्द मी पाळले आहेत. माझ्यापेक्षा जास्त प्रेम जनतेने मुंडेसाहेबांना दिले. या गडाचं फार महत्त्व आहे. हे पूर्ण महाराष्ट्रालादेखील माहीत आहे. देशातील लोकं येतील असे गड बनवायला हवे. मात्र, हे गड राजकारण्यांचे फड बनू नयेत, अशी आपली भावना आहे. गड तिथेच असतो जिथे लोकांचे आशीर्वाद असतात", असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं. मात्र, त्यांच्या या विधानाचा रोख नेमकं कोणाकडे होता ? याची चर्चा आता बीडमध्ये सुरू झाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"तुमच्या डोळ्यांतील प्रेम कायम राहू द्या. एकीचं बळ दाखवण्याची वेळ आली आहे. एकीच्या बळाची ताकद जगाला दाखवून द्यायची वेळ आली तर दाखवणार का नाही ?", असा सवाल पंकजा मुंडे यांनी लोकांना केला. तसेच प्रत्येकाला संघर्षाला सामोरं जावं लागतं, असंही त्या म्हणाल्या.
"चांगल्या विचाराला खतपाणी घालणं ही काळाची गरज आहे. मी सांगितलं होतं की, ओबीसींचं आरक्षण सुरक्षित झाल्याशिवाय मी हार घालणार नाही. त्यानंतर कोर्टाने निर्णय दिला. त्यानंतर लोकांनी हार घालायला सुरुवात केली. पण सध्या समाजात निर्माण झालेली परिस्थिती पाहून मला फेटा घालण्याची इच्छा होत नाही. फेटा घालायला लागणारा स्वाभिमान माझ्यामध्ये असेल, पण मनामधील चिंता जोपर्यंत संपत नाही, समाजासमाजात उभ्या राहिलेल्या भिंती जोपर्यंत आपण पाडत नाही, तोपर्यंत फेटा घालण्याची आपली इच्छा नाही. जेव्हा सर्व जाती धर्माचे लोकं एका छताखाली सुखाने नांदतील तेव्हा आपण फेटा घालू", असंही त्या म्हणाल्या.
(Edited By-Ganesh Thombare)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.