Pankaja Munde On BhagwanGad: महंतांचे खडेबोल, पंकजांचा अहंकार पुन्हा दुखावला..

Beed Politics : बहिण भावांमधील कडवटपणा नाहीसा होणार याचा आनंद उपस्थितांच्या चेहऱ्यावर होता. तर दुसरीकडे पंकजा यांना शास्त्रींनी दिलेल्या उपदेशामुळे काळजी.
Pankaja Munde and Namdev Shastri News
Pankaja Munde and Namdev Shastri NewsSarkarnama
Published on
Updated on

Bharajwadi News: पंकजा मुंडे यांनी स्वाभीमान जपावा, पण अंहकार सोडावा, असे खडे बोल भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी कालच्या नारळी सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना सुनावले. एकीकडे धनंजय मुंडे यांनी भगवान गडाच्या साक्षीने पंकजा आणि त्यांच्यात असलेला कडवटपणा कायमचा मिटवण्याचा संकल्प हाती घेतला. त्याला पंकजा यांनीही दुजोरा दिला, परंतु नामदेव शास्त्री यांनी अहंकारावरून दिलेला सल्ला काही पंकजा यांना रुचला नाही. उलट त्यांच्या अंहकारच पुन्हा दुखावला गेला असे दिसते.

Pankaja Munde and Namdev Shastri News
Dhangar Reservation: 'धनगर की धनगड' पुरावे सादर करा; उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि भगवानगडाचे नाते अतुट होते. त्याकाळात होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या भाषणातून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडायच्या.(Dhnanjay Munde) गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर महंत नामदेव शास्त्री यांनी गडाचा वापर राजकारणासाठी करता येणार नाही, अशी भूमिका घेत दसऱ्याला होणाऱ्या राजकीय भाषणाला पायबंद घातला. पंकजा मुंडे यांनी गडाच्या पायथ्याशी सभा घेत भाषण केले, त्यावेळी झालेला गोंधळ आणि भाषण पंकजा यांचे गडाजवळचे शेवटचे भाषण ठरले होते.

तेव्हापासून पंकजा यांनी पुन्हा कधी भगवान गडाची पायरी चढली नव्हती. उलट बीड जिल्ह्यात सावरगाव येथे पंकजा यांनी भगवान भक्तीगडाची स्थापना केली. तेव्हापासूनच भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यातील अंतर वाढले. पंकजा भगवान गडापासून अंतर राखून असतांनाच धनंजय मुंडे मात्र भगवान गडाच्या आणि महंतांच्या अधिक जवळ गेले. महंतांनी धनंजय मुंडे यांना झुकते माप दिल्यामुळे पंकजा आणि शास्त्री यांच्याती कटुता अधिकच वाढल्याचे दिसून आले.

पंकजा यांनी स्थापन केलेला सावरगावचा भगवान भक्तीगड अंहकारातून निर्माण केला अशी भावना झाल्यानेच नामदेव शास्त्रींकडून पंकजा यांच्यावर टीका केली गेली, अशी चर्चा आहे. काल भगवान गडावर पंकजा मुंडे-धनंजय मुंडे एकत्र आले हे चित्र त्यांच्या समर्थकांना सुखावणारे होते. नामदेव शास्त्री यांनी देखील या दोघांचे स्वागत करत दोघेही खूप मोठे आहेत, मुंडे घराण्याचेच आहेत, त्यांचे भवितव्य उज्वल असल्याचा उल्लेख केला.

पण तो करत असतांनाच त्यांनी पकंजा मुंडे यांना अंहकार कमी करण्याचा सल्ला दिला. कुणाचा तरी शब्द पाळत जावा, कुणाचे तरी ऐकलं पाहिजे, असे म्हणत त्यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली. जनता आज डोक्यावर घेते, उद्या पायदळी तुडवते हे सांगतानाच कालपर्यंत धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख करणारे लोकच आज त्यांच्या पाठीशी असल्याचे शास्त्रींनी आपल्या भाषणात सांगितले. यावरून महंत आणि धनंजय मुंडे यांचे संबंध किती जिव्हाळ्याचे आहेत, याची प्रचिती आली. एकीकडे मुंडे बहिण भावांमधील कडवटपणा नाहीसा होणार याचा आनंद उपस्थितांच्या चेहऱ्यावर होता.

Pankaja Munde and Namdev Shastri News
Sharad Pawar News : ठाकरेंच्या भेटीनंतर शरद पवारांनी एका वाक्यात सांगितले.. ; "आमची मते वेगळी ..

तर दुसरीकडे पंकजा यांना शास्त्रींनी दिलेल्या उपदेशामुळे काळजीही वाटत होती. महंतांनी दिलेला सल्ला पंकजा यांना फारसा रुचला नाही, पटला नाही हे त्यांच्या भाषणावरून दिसून आले. भगवान गडावर न येण्याचा आपला निर्णय अहंकारातून नाही तर गडाच्या काळजीतून घेतल्याचे पंकजा यांनी सांगितले. लेकराच्या काळजीपोटी हिरकणी जशी गड उतरून गेली होती, त्याच काळजीतून समाजासाठी आणि गडाच्या महंतांच्या प्रतिमेला तडा जावू नये म्हणून आपण तेव्हा आनंदाने, शिव्या-शाप न देता गड सोडल्याचे पंकजा यांनी स्पष्ट केले.

एकंदरित महंतांनी अहंकारावरून दिलेला सल्ला, उपदेश पंकजा यांना खटकला. ज्याला महंत अहंकार म्हणतात तो आपला स्वाभीमान असल्याचे पंकजा यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा भगवान गडावर पंकजा जातील की नाही ? याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पंकजा-धनंजय मुंडे यांनी ज्या महंत नामदेव शास्त्री यांच्या साक्षीने कडवटपणा नाहीसा करण्याचा संकल्प केला, त्या महंताबद्दल पंकजा यांच्या मनात असलेला कडवटपणा जाणार का? हे मात्र येणारा काळच ठरवेल..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com