Majalgaon Assembly Constituency: विधानसभा निवडणुकीसाठी सर्वत्र जोरदार प्रचार सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा सभांचा धडका लागला आहे. यंदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील बदललेल्या राजकारणामुळे चांगलीच रंजक बनली आहे. याचा प्रत्यत निवडणूक प्रचारातील भाषणांमधून दिसतो आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना पंकजा मुंडे यांचं भाषण चांगलंच चर्चेत आलं आहे.
पंकजा मुंडे (Pankaja munde) म्हणाल्या, 'मी राजकारणातच काय जीवनामध्येच जो दिवस उजाडला त्याचा विचार करते, जो गेला त्या दिवसाचा फार विचार मी करत नाही. आपल्या हातात ते नाही. झाल्या त्या गोष्टी जिव्हारी लावून मग कुढत बसणं माझ्या हातात नाही. 2019ला मी पडले तेव्हा दुसऱ्या क्षणी मी कामाला लागले. लोकसभेत माझा पराभव झाला तर लगेच मी लोकांना भेटून त्यांनी मला एवढं मतदान केलं त्याबद्दल मी आभार मानायला गेले. आता ते दुर्दैवं माझं, जिल्ह्याचं की तुमचंय की काय माहिती नाही, की आपल्याला त्या उंचवीर जायचं होतं, ती संधी होती ती नाही मिळाली.'
'पण त्याबद्दल माझ्या मनात कोणताही राग किंवा सूडाची भावना अजिबात नाही. कारण, मी सांगितलं की बीड जिल्हा माझं अंगण आहे. माझं वय लहान जरी असलं तरी या बीड जिल्ह्याती प्रत्येक व्यक्तीकडे बघताना मी मातृत्वाच्याच दृष्टीतून बघते. तेव्हा माझ्या मनात कोणतीही कोप भावना येत नाही. मी तुम्हा सर्वांना एवढीच विनंती करायला आले की, महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांना प्रचंड मताने विजयी करा.' असं आवाहन पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं.
याशिवाय 'आम्ही एकमेकांच्या विरोधात लढणारे पक्ष. खरंतर मला कधीच वाटलं नाही की, घड्याळाचा प्रचार मला करावा लागेल. कारण महाराष्ट्रात नव्हे तर बीडमध्ये अशी युती होवू शकते, असं कधीच कोणाला वाटलं नव्हतं. परंतु आता झाली आहे. कारण घटना तशा घडल्या. इतिहासात घडल्या नाहीत तशा घटना घडल्या.
एका पक्षाचे दोन पक्ष झाले राष्ट्रवादीचे (NCP) आणि शिवसेनेचे आणि त्यांचा एक एक भाग जो एकप्रकारे पक्षच सोबत घेवून सत्ता स्थापन केली मोदींनी कारण, महाराष्ट्रात येणाऱ्या काळातही महायुतीची सत्ता स्थापन करायची आहे. राष्ट्रप्रथम त्यामुळे आम्हाला मोदींचा आदेश मान्य आहे आणि आम्ही युतीही स्वीकारली आणि आम्ही रुळलो सुद्धा.' असंही पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवलं.
तसेच 'लोकांनी महायुती स्वीकारली आहे, कारण एवढ्या चांगल्या योजना महायुतीने केल्या आहेत. या महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा आणण्यामध्ये लाडकी बहीण योजना सर्वात जास्त योगदान देणार आहे. महायुतीने लाडक्या बहिणीला दर महिन्याला १५०० रुपये ओवाळणी घालायचं ठरवलं आहे. आता तर महायुतीच्या जाहीरनाम्यातून जाहीर करण्यात आलं आहे, परत सरकार आलं तर २१०० रुपये आम्ही महिलांना देणार.' अशी माहिती यावेळी पंकजा मुंडे यांनी मतदारांना दिली.
(Edited by - Mayur Ratnapakhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.