

शिवाजी वाघमारे :
Local Body Election News : परभणी जिल्ह्यातील सातही पालिकांच्या निवडणुकीत मंगळवारी झालेल्या मतांची टक्केवारी समोर आली. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीतील मतदानाशी तुलना केली असता यावेळी मतदानाचे प्रमाण घसरल्याचे समोर आले आहे. काल झालेल्या निवडणुकीसाठी 72.55 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जे मागील निवडणुकीपेक्षा चार टक्क्यांनी घटले आहे. तिरंगी, बहुरंगी लढती होऊनही मतदानाची टक्केवारी घसरल्याने यशाचा गुलाल नेमका कोणाला हुलकावणी देणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
सातही पालिकांच्या निवडणुका अतिशय चुरशीने लढल्या गेल्या. काही ठिकाणी मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात लढले, तर काही ठिकाणी विरोधी पक्ष एकत्र येऊन लढले. कुठे आघाड्या झाल्या, तर कुठे थेट पक्षच मैदानात उतरल्याने मतदारांपुढे गोंधळाची स्थिती होती. त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचे दिसून येते. सर्वच पालिकांमध्ये 2016 च्या निवडणुकीपेक्षा मतदानाची टक्केवारी घटली आहे. तिरंगी, बहुरंगी लढती असतानाही मतदारांमध्ये उदासिनता दिसून आली आहे.
या घटलेल्या अथवा वाढलेल्या टक्केवारीचा फायदा व नुकसान नेमके कोणाला होणार? याचीच चर्चा आता रंगू लागली आहे. 2016 व नंतर झालेल्या पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष (गंगाखेड, सोनपेठ), एकत्रित शिवसेना (मानवत, पूर्णा) व एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसने (जिंतूर, पाथरी) प्रत्येकी दोन नगराध्यक्षपदांवर विजय मिळवला होता. एक नगराध्यक्षपद (सेलू) आघाडीने प्राप्त केले होते. गेल्या काही वर्षांत राज्यातील घडामोडीमुळे जिल्ह्यातही मोठी राजकीय स्थित्यंतरे झाली.
प्रमुख पक्षांनादेखील या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी उमेदवार देता आले नाहीत. राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या पक्षांनी बहुतांश ठिकाणी स्वतंत्र उमेदवार उतरवले, तर काही ठिकाणी आघाडीत हे पक्ष सहभागी झाले. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एखाद-दोन ठिकाणी उमेदवार दिले. परंतु बहुतांश ठिकाणी आघाडीत जाण्यातच समाधान मानले. त्यामुळे मतमोजणीनंतर कोणता पक्ष बाजी मारणार? याबाबत उमेदवार व त्यांचे समर्थक आडाखे बांधत आहेत.
नगरपालिका निवडणुकीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार संजय जाधव, डॉ. फौजिया खान, आमदार राजेश विटेकर, रत्नाकर गुट्टे, माजी आमदार बाबाजानी दुर्रानी, विजय भांबळे, सुरेश वरपुडकर, ॲड. विजय गव्हाणे, डॉ. मधुसुदन केंद्रे, हरिभाऊ लहाने या नेत्यांची धडधडही मतदानाचा घटलेला टक्का आणि लांबलेला निकाल यामुळे वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.