Parbhani Loksabha 2024: इच्छुक रंगले कीर्तनात! आतातरी देवा मला पावशील का ?

Maharashtra LokSabha Election 2024:माजी खासदार संजय जाधव यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. दोन वेळा आमदार, दोन वेळा खासदारकी उपभोगलेले जाधव हटट्रिक साधण्याच्या प्रयत्नात आहेत.
Parbhani Loksabha 2024
Parbhani Loksabha 2024Sarkarnama
Published on
Updated on

Parbhani : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊनही जागावाटप आणि उमेदवारीचा घोळ संपत नसल्याने उमेदवारांनी आता देवालाच साकडे घातले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप रखडलेलेच आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडेच असेल हे निश्चित असले तरी त्याबाबत अजूनपर्यंत अधिकृत घोषणा झालेली नाही.

महायुतीच्या जागावाटपात परभणी कोणाकडे असेल, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते प्रचंड आशावादी आहेत. नेत्यांनी मात्र आता देवाला साकडे घातले आहे. प्रतिवर्षी पंढरपूरची पायी वारी करणारे माजी खासदार संजय जाधव यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. दोन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदारकी उपभोगलेल्या जाधव हट्ट्रिक साधण्याच्या प्रयत्नात आहेत.

महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी शक्तिप्रदर्शनही केले. हिंदुत्वाची प्रतिमा आणि महाविकास आघाडीसोबत असणारा मुस्लिम मतदार यांच्यात समन्वय साधताना तारेवरची कसरत होणार आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी झाली, तर त्याचाही फायदा होणार आहे. मात्र, एमआयएमने निवडणुकीच्या मैदानात उमेदवार उतरवला तर त्यामुळे मुस्लिम मतदार दुरावू शकतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विटेकर हे अधिक सावध...

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रबळ उमेदवार राजेश विटेकर यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत यशाने हुलकावणी दिली. त्यामुळे विटेकर हे अधिक सावध आहेत. या वेळी कुठलीही कमतरता असू नये, यासाठी विटेकर यांनी पूर्ण फिल्डिंग लावली आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विटेकर यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. महायुतीचा जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असावा, यासाठी सुरुवातीपासूनच ते आग्रही आहेत. प्रसिद्ध कीर्तनकार हभप इंदुरीकर महाराज यांचे पाथरी येथे कीर्तन झाले. या वेळी विटेकर यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले व श्रोत्यात बसून कीर्तन श्रवण केले.

Parbhani Loksabha 2024
Subhash Bhamre News: उमेदवार बदला; BJP कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींना ई-मेल; डॉ. सुभाष भामरे अस्वस्थ

भारतीय जनता पक्षाचे लोकसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी मतदारसंघात जय्यत तयारी केली. त्यांच्या कन्या व जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर या पक्षाकडून प्रमुख दावेदार आहेत. मात्र, उमेदवारीच्या शर्यतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस एक पाऊल पुढे असल्याचे दिसून आल्यानंतर रामप्रसाद बोर्डीकर यांनी मुंबईकडे धाव घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यात चर्चाही झाली.

मुंबईहून परतल्यानंतर बोर्डीकर यांनी जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील प्रमुख असलेले ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर हे वारकरी संप्रदायात सर्वदूर परिचित असलेले ह.भ.प. मारोतराव महाराज दस्तापूरकर यांचे नातू आहेत. उमेदवारीसाठी सर्व प्रयत्न झाल्यानंतर नेत्यांनी आता देवालाच साकडे घातले आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com