Lok Sabha Election 2024 : केवळ वारसा मिळाला म्हणून वारसदार होता येत नाही तर त्यासाठी कर्तृत्वही सिद्ध करावे लागते. राजकीय क्षेत्रात स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करून वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेणारे परभणी जिल्ह्यातील नेतृत्व म्हणजे राजेश विटेकर आहेत. सरपंचपदापासून, बाजार समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेले राजेश विटेकर हे अजित पवारांच्या खास मर्जीतले म्हणून ओळखले जातात. (Latest Marathi News)
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील विटा हे त्यांचे मूळ गाव. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष त्यांनी वेधून घेतले. पक्षनेतृत्वानेही त्यांच्या कर्तृत्वाला वाव देत परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. विटेकर यांनीही पक्षनेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवत कडवी झुंज देत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी झाल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ देण्याचे ठरवले. लोकसभेच्या 2024 मधील निवडणुकीसाठी ते सज्ज झाले आहेत.
राजेश उत्तमराव विटेकर
27 मे 1980
बी. एस्सी.
राजेश विटेकर यांचे वडील दिवंगत उत्तमराव विटेकर हे राजकारणात सक्रिय होते. राज्यात पुलोद सरकार असताना ते आमदार होते. आई श्रीमती निर्मलाताई विटेकर यासुद्धा राजकारणात सक्रिय आहेत. 2020 ते 2022 दरम्यान त्या परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. बंधू श्रीकांत विटेकर हे सोनपेठचे नगरसेवक म्हणून कार्यरत होते. राजेश विटेकर यांचे चुलतसासरे विलासराव खरात हेसुद्धा राजकारणात सक्रिय होते. त्यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. राजेश विटेकर यांच्या पत्नी स्मिता या गृहिणी असून, त्यांना मुलगा विराज आणि मुलगी विजेता अशी दोन अपत्ये आहेत.
शेती
परभणी
राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट)
राजेश विटेकर यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात गंगाखेड बाजार समितीपासून झाली. 2005 मध्ये विटा या गावाचे सरपंच म्हणून त्यांची निवड झाली. 2007 मध्ये जिल्हा परिषद गटातून त्यांनी विजय मिळवत जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश केला. 2005 ते 2022 या कालावधीत सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते सभापती होते.
२०१४ मध्ये त्यांची परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते विद्यमान संचालक आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. मोदीलाट आणि परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची घसघशीत मते मिळवली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडाळी झाल्यानंतर राजेश विटेकर यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
राजेश विटेकर हे चिंतामणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय असतात. प्रतिष्ठानतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. कोरोनाकाळात आवश्यक साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले होते. तसेच श्री छत्रपती शिवाजीमहाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था उभारून विद्यार्थी व विशेषतः विद्यार्थिनींच्या शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. पारंपरिक शिक्षणासोबत कृषी तंत्र विद्यालयाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील आधुनिक शिक्षण देण्यात येत आहे. महातपुरी, नरवाडी, विटा या ठिकाणी त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत.
राजेश विटेकर यांनी 2019 ची निवडणूक लढवली होती. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विटेकर पराभव झाला. शिवसेनेचे उमेदवार खासदार संजय जाधव यांची दुसरी टर्म होती. शिवसेना-भाजप युतीमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघ कायमच शिवसेनेकडे राहिला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीमध्ये परभणीची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने लढवली. परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो.
संजय जाधव यांना 5,38,941 मते मिळाली, तर राजेश विटेकर यांना 4,96,742 मते प्राप्त झाली. केवळ 42,199 मतांच्या फरकाने राजेश विटेकर यांचा पराभव झाला. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या आलमगीर खान यांना तब्बल 1,49,946 मते मिळाली. शिवसेनेचा बालेकिल्ला आणि नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता या पार्श्वभूमीवर परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या विद्यमान उमेदवाराविरोधात दिलेली ही लढत चर्चेचा विषय बनली होती. मतविभागणीमुळे त्यांचा पराभव झाला.
राजेश विटेकर यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काम केले असल्यामुळे ग्रामीण भागात त्यांचा चांगला संपर्क आहे. तसेच कौटुंबिक नातेसंबंधांमुळे परभणी लोकसभा मतदारसंघात असलेल्या जालना जिल्ह्यातील गावांतही त्यांचा संपर्क आहे. याचा फायदा त्यांना निवडणुकीत नक्कीच होऊ शकतो.
राजेश विटेकर हे विविध समाजमाध्यमांवर सक्रिय आहेत. फेसबुक, ट्विटर (एक्स) व इन्स्टाग्राम या लोकप्रिय समाजमाध्यमांतून ते जनतेच्या संपर्कात असतात.
राजेश विटेकर यांचे व्यक्तिमत्त्व मितभाषी आहे. तसेच सहजतेने संवाद साधण्याची त्यांची शैली युवावर्गाला आकर्षित करणारी आहे. ग्रामीण भागातील नेतृत्व असल्याने शेतीविषयक प्रश्नांची त्यांना जाण आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या खास मर्जीतले असल्याने विटेकर यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले जाते. बाजार समिती, जिल्हा परिषदेत नेतृत्व केल्यामुळे प्रशासनाचा अनुभव आहे. विशेष म्हणजे महायुतीमधील घटकपक्ष भाजप व शिवसेना सोबत असल्याने व देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता असल्याने त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला मिळू शकतो.
परभणी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी कायमच शिवसेनेच्या बाजूने कौल दिला आहे. आक्रमक हिंदूत्वाच्या विचारांनी येथील जनतेला भुरळ घातली आहे. विटेकर यांनी आजवरचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून केला आहे. खासदार संजय जाधव यांच्याविरुद्ध लढत देताना राजेश विटेकर यांना विशेष तयारी करण्याची आवश्यकता आहे. पक्षांतर्गत गटबाजीवर मात करून सर्वांशी जुळवून घेणे आवश्यक असेल. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील बंडाळीनंतर प्रारंभी शरद पवार यांच्याशी निष्ठा व्यक्त करणारे, परंतु नंतर घूमजाव करीत अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याच्या निर्णय घेणारे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याशी असणारे विटेकर यांचे वैमनस्य पक्षाच्या प्रदेशपातळीवर गाजले होते.
परभणीचे खासदार संजय जाधव यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खासदार जाधव हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे उघड आहे. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळतो, याबद्दल तिन्ही पक्षांकडून दावे केले जात आहेत. मात्र 2019 च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून परभणीच्या जागेसाठी जोरदार तयारी केली जात आहे.
परभणीच्या पालकमंत्रिपदी राज्याचे क्रीडामंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय बनसोडे यांची नियुक्ती केली गेली. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसला झुकते माप देत नऊपैकी चार सदस्यांना स्थान मिळाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कर्जत येथील अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले होते की, ज्या ठिकाणी पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार उभे राहतील.
या सर्व घटनाक्रमामुळे महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाला तर अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक राजेश विटेकर हेच पक्षाचे उमेदवार असतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे राजेश विटेकर यांना उमेदवारी मिळाली नाही, तर ते अन्य पक्षात जाण्याची कोणतीही शक्यता नाही.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.