

Eknath Shinde Shiv Sena Sambhajinagar : शिवसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील वाद वाढतच आहे. पक्षावर दवाब निर्माण करण्याचे जंजाळ यांचे हे अस्त्र त्यांच्यावरच उलटवण्याची खेळी शिरसाट यांनी केली आहे.
पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे कैफियत मांडल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नाही. उलट जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्याने राजेंद्र जंजाळ यांचा संयम सुटत चालला आहे.
मला पर्याय निवडला असेल तर माझ्यासाठी इतर पर्याय खुले आहेत, असा इशारा जंजाळ यांनी दिला होता. गेल्या अनेक दिवसापासून जंजाळ हे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार अशाही चर्चा आहेत. राज्य पातळीवर शिवसेना-भाजपचे संबंध एकमेकांचे पदाधिकारी, कार्यकर्ते फोडाफोडीमुळे कमालीचे ताणले गेले आहे. स्वतः संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना सुनावले होते.
अशावेळी त्याच भाजपमध्ये (BJP) जाण्याची भाषा केली जात असल्याने पालकमंत्री शिरसाट कमालीचे संतापले. जंजाळ यांनी त्यांना हवा तो पर्याय स्वीकारावा, अशा शब्दात शिरसाट यांनी जंजाळ यांचे दबावास्त्र मोडून काढण्याचा इशारा दिला आहे. याआधीही कुठे जायचे तिथे जा, म्हणत शिरसाट यांनी जंजाळ यांच्याशी असलेल्या वादात माघार न घेण्याची भूमिका घेतली होती. त्यावर ते कायम असून जंजाळ यांच्या आरोपाना ते अधिक आक्रमकपणे प्रत्युत्तर देत आहेत.
काही दिवसांपुर्वी शिवसेनेत राजेंद्र जंजाळ यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवत माजी महापौर त्र्यंबक तुपे यांना नियुक्त करण्यात येत असल्याचा आरोप जंजाळ यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला होता. यावर संजय शिरसाट यांना जेव्हा माध्यमांनी विचारले तेव्हा, संजय शिरसाट यांनी जंजाळ याचा आरोप फेटाळून लावला. पक्षात जिल्हाप्रमुख बदलाचा कुठलाही निर्णय झालेला नाही. जंजाळ यांनी जर मला पर्याय खुले आहेत असे म्हटले असेल तर त्यांनी ते पर्याय स्वीकारावेत, असा टोला लगावला.
या विषयावर एकनाथ शिंदे यांनी तोडगा काढण्याची जबाबादारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवली आहे. परंतु सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने ते तिकडे आहेत. तर नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही नागपूरात आहेत.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीआधीच शिरसाट-जंजाळ वादावर तोडगा काढण्यासाठी अधिवेशन काळात स्थानिक पदाधिकाऱ्यांना नागपूरमध्ये बोलावून घेत तिथेच बैठक घेतली जाणार असल्याचीही चर्चा आहे. त्यानंतरच संभाजीनगर शिवसेनेतील वाद शमणार? की मग राजेंद्र जंजाळ वेगळा मार्ग पत्करणार हे स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.