Budget Session : हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू आणि गुटखा विक्री सुरू आहे. या संदर्भात वेळोवेळी कारवाईची मागणी केली, गेल्या अधिवेशनात देखील मी हा मुद्दा उपस्थीत केला होता. (Hingoli) पण त्यावर सरकारकडून काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यात महिलांवरील हल्ले, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
माझ्या सारख्या लोकप्रतिनिधीवर देखील हल्ला झाला. अवैध धंद्याविरुद्ध मी बोलू नये यासाठी तो करण्यात आला होता, पण मी गप्प बसणार नाही, असा इशारा देतांनाच अवैध दारू, गुटखा विक्री कधी रोखणार? असा सवाल आमदार प्रज्ञा सातव (Pradnay Satav) यांनी विधान परिषदेत केला. (Congress) यावर मंत्री शंभुराजे देसाई यांनी अवैध दारू विक्री रोखण्यासाठी फ्लाईंग स्काॅडमध्ये वाढ करण्यात येणार असून मनुष्यबळ वाढवण्यासाठी आमच्या विभागाकडून तातडीने भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
प्रज्ञा सातव यांच्यावर गेल्या महिन्यात मतदारसंघात असतांना अचानक हल्ला झाला होता. त्यानंतर जिल्ह्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. सातव यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीवर किरकोळ कलमं लावण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. आज सभागृहात पुन्हा तो मुद्दा उपस्थितीत करण्यात आला, यावर सभापती नीलम गोऱ्हे यांनी सातव यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीवर १२० (ब) कलम लावा, असे निर्देश दिले.
प्रज्ञा सातव यांनी अवैध दारू विक्री, गुटखा विक्री करणारे निर्ढावले आहेत. पोलिस व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी असल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नाही. मी अनेकदा तक्रारी करून देखील अवैध दारू बनवून विकणाऱ्यांवर कारवाई होत नाही. उलट मी या विरोधात आवाज उठवू नये म्हणून माझ्यावरच या लोकांकडून हल्ला करण्यात आल्याचा आरोप सातव यांनी केला. पण मी कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही, जोपर्यंत जिल्ह्यातून अवैध दारू विक्री, गुटखा विकणाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मी माझा लढा सुरूच ठेवणार, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या विषयावर बोलतांना राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांनी आपल्या मतदारसंघातील अवैध गुटखा विक्रेत्यांना आपण स्वतः पकडून दिल्यानंतर देखील कारवाई झाली नाही. खालच्या पोलिस कर्मचाऱ्यापासून आयजीपर्यंत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना हप्ते जातात असा गंभीर आरोप खडसे यांनी केला. मध्यप्रदेशातून आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बंदी असलेला गुटखा येत असल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाया झाल्या पाहिजेत, असेही म्हणत खडसे यांनी सातव यांच्या मुद्याला समर्थन दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.