Kannad APMC Result News : आजी-माजी आमदारांच्या पॅनलचा धुव्वा ; जाधव-पाटलांच्या शिवशाहीला १६ जागा..

Mla Udaysingh Rajput : राजपूत यांच्या नागद गटात सर्व ग्रामपंचायती ताब्यात असताना ६० पैकी केवळ चार मते त्यांच्या उमेदवारांना पडली.
Kannad APMC Result News
Kannad APMC Result News Sarkarnama

Marathwada : कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती (Kannad APMC Result News) निवडणुकीत विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह आम आदमी, स्वाभीमानी शेतकरी संघटना, भाजप-काॅंग्रेस आणि शिंदे गट- संजना जाधव यांचे शिवशाही शेतकरी पॅनल निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. शिवसेनेत फूट पडून राज्यात सत्तांतर झाले तेव्हा कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत हे ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले होते. त्यामुळे बाजार समिती निवडणुकीत त्यांना कसे यश मिळते याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

Kannad APMC Result News
Parbhnai APMC Result News : बोर्डीकरांनी जिंतूर-बोरीत विजय मिळवला, जिल्ह्यात महाविकास आघाडीचीच सरशी..

तर दुसरीकडे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी नुकताच बीआरएस पक्षात प्रवेश करत आपले स्वतंत्र शेतकरी पॅनल निवडणुकीत उभे केले होते. त्याला देखील मतदार कसा प्रतिसाद देतात? याची सर्वांना उत्सूकता होती. (Udaysingh Rajput) परंतु माजी आमदार नितीन पाटील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावासहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी एकित्रपणे तयार केलेल्या शिवशाही शेतकरी पॅनलने सगळ्यांना धूळ चारत १८ पैकी १६ जागांवर विजय मिळवत सगळ्यांनाच धक्का दिला.

आमदार उदयसिंह राजपूत व माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलची मात्र या निवडणुकीत पुरती हाराकिरी झाली. (Kannad) त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. भाजप व कॉंग्रेस पक्षाने एकत्र येऊन उतरवलेल्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार किशोर पवार हे एकमेव उमेदवार ४१४ मते घेऊन विजयी झाले. माजी आमदार नितीन पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य संजना जाधव यांनी या निवडणुकीत चमत्कार केल्याची चर्चा या निमित्ताने सुरू आहे.

या निवडणुकीत राजकीय पक्षापेक्षा नेत्यांनी व्यक्तिगत पातळीवर निवडणुकीचे नियोजन केले. स्व.बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष, एकनाथ शिंदे गटाची सावली टाळून माजी आमदार नितीन पाटील यांनी जे निवडून येतील या मेरीटवरच उमेदवार दिले. दुधसंघाचे संचालक गोकुळसिंग राजपूत, जिल्हा बँकेचे संचालक डॉ मनोज राठोड, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद, पिशोरचे माजी सरपंच बाळासाहेब जाधव, चिकलठाणचे माजी सरपंच युवराज चव्हाण, व्यापारी प्रकाश अग्रवाल हे दिग्गज शिलेदार निवडणूक रिंगणात उतरवले.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियावर प्रचार मोहीम राबवली, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आमदार उदयसिंग राजपूत आणि राष्ट्रवादीचे माजी गटनेते संतोष कोल्हे यांची या निवडणुकीत दिलजमाई झाली. मात्र राजपूत हे निवडणूक जिंकण्याच्या ईर्षेने निवडणुकीत उतरले नाही, असे बोलले जाते. स्वतःच्या नागद गावातील मतदारसंघातही त्यांची दमछाक झाल्याचे पहायला मिळाले. राजपूत यांच्या नागद गटात सर्व ग्रामपंचायती ताब्यात असताना ६० पैकी केवळ चार मते त्यांच्या उमेदवारांना पडली. काही ठिकाणी त्यांच्या उमेदवारांना भोपळा देखील फोडता आला नाही. राजपूत यांचे संपुर्ण पॅनल पराभूत झाल्यामुळे त्यांना हा मोठा धक्का समजला जातो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com