औरंगाबादच्या पाणी प्रश्नाचा उल्लेख करत राज्यपाल म्हणाले, `मोदी है तो मुमकीन है`..
औरंगाबाद : शहराचा पाणी प्रश्न राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी थेट राष्ट्रीय पातळीवर नेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या जाहीर कार्यक्रमात राज्यातील रखडलेल्या योजनांचा उल्लेख करतांना राज्यपालांनी औरंगाबादेतील पाणी प्रश्नावर देखील भाष्य केले. (Governor Bhagat Singh Koshyari News)
मी औरंगाबादेत (Aurangabad) एक दिवस मुक्कामी होतो, तेव्हा मला भेटायला आलेल्या लोकांनी सांगितले इथे सात-आठ दिवसाला एकदा पाणी येते. ही काही चांगली गोष्ट नाही. राज्या अशा अनेक योजना आहेत, ज्या गेल्या २० वर्षापासून रखडलेल्या आहेत, तर काही आताच्या काळातल्या आहेत. व्यासपीठावर मुख्यमंत्री देखील उपस्थितीत आहेत, प्रधानमंत्री पण आहेत, त्यामुळे या योनजा मार्गी लागल्या पाहिजेत, लोकांना पाणी मिळाले पाहिजे. कारण `मोदी है तो मुमकीन है`, असेही राज्यपाल (Bhagat Singh Koshyari) म्हणाले.
औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावरून सध्या जोरदार राजकारण सुरू आहे. शहवासियांच्या पाण्याचा प्रश्न निश्तिच गंभीर आहे. याला महापालिकेत शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून सत्ता भोगणारा भाजप देखील तेवढाच जबाबदार आहे. पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन युती तुटली तेव्हापासून भाजपने शहरातील पाणी प्रश्नाल एकटी शिवसेनाच कशी जबाबदार आहे हे सांगण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या मोहिमेत सहभागी झाले. शिवसेनेने त्यानंतर पाणीप्रश्न सोडवण्यासाठी युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्या असल्या तरी पाणीपुरवठा योजना मोठी असल्याने तिला दोन ते अडीच वर्ष लागणार आहेत. त्यामुळे तोपर्यंत पाणीप्रश्नावरून राजकारण सुरूच राहणार असे दिसते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मध्यंतरी एक दिवस औरंगाबादेत मुक्कामी होते. तेव्हा भाजपच्या स्थानिक पदाधिकारी, नेत्यांनी त्यांच्याकडे पाणीप्रश्ना संदर्भात निवेदन दिले होते. योगायोगाने आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकत्र आले होते. ही संधी साधत राज्यपालांनी शिवसेनेवर निशाणा साधण्याची संधी हेरलीच.
थेट औरंगाबादच्या पाणी प्रश्नाचा उल्लेख करत राज्यपालांनी ही योजना मोदीच पुर्ण करू शकतील असे अधोरेखित केले. `मोदी है तो मुमकीन है`, अशी भाजपची राजकीय घोषणा राज्याच्या राज्यपाल या संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने जाहीरपणे द्यावी, याबद्दल राजकीय वर्तुळात नाराजीचा सूर उमटत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.