

Shiv Sena news : 'उबाठा' पक्ष संपवायला इतर कोणाची गरज नाही. या पक्षाचे नेते हे शेखचिल्ली आहे, ज्या फांदीवर बसले तीच कापत आहेत, अशा शब्दांत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारावे ,असे आम्ही कधीही म्हटलो नाही, असे सांगत शिरसाट यांनी राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य केले.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नांदेड दौऱ्यात ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. ज्या कार्यकर्त्यांनी झेंडे दाखवले त्यांना विचारा कशाला दाखवले? पक्षाच्या नेतृत्वाला काही तरी करत असल्याचे दाखवायचे आहे. खासदारांच्या मतदारसंघात दौरे करून उद्धव ठाकरे यांनी काय उजेड पाडला? यांना मंगल कार्यालयात मेळावा घ्यावा लागला, यापेक्षा दुर्दैव काय?, असा टोला शिरसाट यांनी लगावला. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट यांनी हे भाष्य केले.
राज ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर टीका करताना असभ्य भाषा वापरल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. त्यांच्या या विधानावर हक्कभंग आणला जाऊ शकतो, अशी शक्यता भाजपाने व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी काल केलेला वक्तव्य कोणत्या आधारावर केला कळायला मार्ग नाही? तुमच्या पक्षात असेल तर वाघ आणि दुसऱ्याकडे गेले की ती वेश्या, असे स्टेटमेंट करणे गैर आहे. पक्षांतर्गत मतभेद नाहीत का? तुमचे सर्व सहन करावे असे अॅग्रीमेंट केलेले आहे का? पक्षश्रेष्ठी वेळ देत नाहीत तरी दबूनच राहायचं काय? तुम्ही गद्दार , खोके घेतले म्हणता, मात्र तुम्ही कार्यकर्ते सांभाळण्यात अपयशी ठरलाय हे मान्य करा, अशी टीकाही शिरसाट यांनी केली.
सचिन अहिर यांचा शिवसेनेतील प्रवेशाने अनेकांना पोटदुखी सुरू झाली आहे. परंतु अशा एखाद्या मोठ्या नेत्याबद्दल विधान करणे चुकीचे आहे. एकनाथ शिंदे यांना आमदारकीचा राजीनामा देऊन वरळीतून निवडणूक लढवून दाखवा, असे आवाहन दिले जात आहे. पण शिंदे हे एवढे पॉप्युलर आहेत की ते महाराष्ट्राच्या कोणत्याही मतदारसंघातून निवडून येऊ शकतात. वरळीमध्ये विधानसभेला तुम्हाला निवडून येताना तुम्हाला कसा लुंगी डान्स करावा लागला होता, असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अर्थखाते मिळणार का? यावर बाहेर चर्चा होऊ शकत नाही. सुनेत्रा पवार यांना अर्थ खाते मिळणार का? याचा निर्णय वरिष्ठ घेतील, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले. अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात भांडण असल्याचे चित्र विरोधक निर्माण करत आहेत. या दोघांमध्ये भांडण झाले तर तुम्हाला काय फायदा? दुसऱ्याचे घर जळताना पाहून तुम्हाला काय फायदा होणार आहे?, असा सवालही शिरसाट यांनी उपस्थित केला.
तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक करताना त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे, असे शिरसाट म्हणाले. भ्रष्टाचारामुळे यापूर्वी सगळं बिनधास्त सुरू होतं. आता औषधी, मिठाई यावर कारवाई होत आहे. या कारवाईचे समर्थन केलं पाहिजे. जे अधिकारी भ्रष्ट आहेत त्यावर देखील करावी सुरू झाली पाहिजे, असेही शिरसाट यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.