Jalna Political News : राजकारणात वडीलांचे बोट धरून आले आणि आज आपली वेगळी ओळख निर्माण केली अशा मराठवाड्यातील तरुण आमदारांपैकी एक म्हणजे भाजपचे आमदार संतोष दानवे. जालना जिल्ह्यातील भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघातून विजयाची हॅट्रीक केल्यानंतर महायुती सरकारमध्ये त्यांच्यावर पंचायत राजच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आज फादर्स डेच्या निमित्ताने संतोष दानवे (Santosh Danve) यांनी आपले वडील, मार्गदर्शक माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आधार आणि खंबीरपणाची सजीव प्रतिमा म्हणजे 'दादा' असे वर्णन करत संतोष दानवे यांनी आपल्या भावना भरभरून व्यक्त केल्या आहेत. बालपणापासून ज्या व्यक्तीकडे बघून मी जग समजून घेतलं, जीवनात नीतिमत्तेचा, सेवाभावाचा, आणि संघर्षाचा वारसा मिळाला ती व्यक्ती म्हणजे माझे वडील मा.रावसाहेब पाटील दानवे (दादा).
माझ्या आयुष्याचा कण अन् कण दादांच्या मायेने, त्यांनी लावलेल्या शिस्तीने, त्यांनी दिलेल्या संस्काराच्या शिदोरीने व्यापलेला आहे. राजकीय आव्हानांना सामोरा जाताना दादांनी माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला प्रत्येक पावलावर भक्कम आधार दिला आहे. (Raosaheb Danve) वडीलाचं आयुष्य म्हणजे एक 'शांत संघर्ष'. तो कधी आवाज करत नाही, कधी तक्रार करत नाही, फक्त जगासमोर न झुकता आपल्या कर्तव्याला पूर्ण प्रामाणिकपणे निभावतो.
दादांचा हाच आदर्श नजरेसमोर ठेवून त्यांच्या अनमोल शिकवणीच्या आणि मार्गदर्शनाच्या बळावर जनसेवेची माझी वाटचाल अविरत सुरू राहील, असे वचन मी पितृदिनानिमित्त देतो. तुमच्यासारखा पिता लाभणे हे खरोखरच माझे भाग्य आहे. जागतिक पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा व सादर प्रणाम!, अशा शब्दात संतोष दानवे यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
वडील रावसाहेब दानवे गेल्या चाळीस वर्षापासून राजकारणात आहेत. संतोष दानवे यांना घरातूनच राजकीय वारसा मिळाला आहे. सर्वात तरुण आमदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दानवे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पंचायत राज समितीचे अध्यक्षपद देत मोठी जबाबदारी सोपवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.