नांदेड : काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी देगलूर मार्गे महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या यात्रेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, आदित्य ठाकरे हे देखील सहभागी होणार असल्याची माहिती काॅंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
८ नोव्हेंबर रोजी शरद पवार (Sharad Pawar) हे नांदेडमध्ये मुक्कामी येणार असून ९ नोव्हेंबर रोजी नायगांव येथे ते पदयात्रेत प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी देखील भारत जोडो यात्रेत सहभागी होण्या संदर्भातील सहमती दर्शवली आहे. परंतु नेमकी तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही, असेही चव्हाण (Ashok Chavan) यांनी स्पष्ट केले. एकता, अखंडता, बंधुभाव आणि लोकशाही टिकवण्यासाठी ही भारत जोडो यात्रा असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
भारत जोडो यात्रे संदर्भात माहिती देतांना अशोक चव्हाण म्हणाले, कन्याकुमारी ते कश्मीरपर्यंतची ही भारत जोडो यात्रा असणार आहे. ७ नोव्हेंबरला सायंकाळी तेलंगणाच्या सीमेवरून देगलूर मार्गे महाराष्ट्रात यात्रा दाखल होणार आहे. राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या यात्रेला सर्वच राज्यांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. सर्वसामान्यांमध्ये यात्रेबद्दल प्रचंड उत्सूकता, आकर्षण आहे. केवळ काॅंग्रेसचीच ही यात्रा नाही, तर सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना व सर्वसामान्यांचा देखील या यात्रेत सहभाग असणार आहे.
लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता `मी पण चालणार` हे घोषवाक्य आम्ही तयार केले आहे. एलईडी व्हॅन मार्फत यात्रे संदर्भातील आतापर्यंतची माहिती पोहचवण्याचे काम करत आहोत. लोकचळवळ निर्माण करण्याचा यात्रेचा हेतू असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व सर्वसामान्य नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन मी करत आहे. वकील, डाॅक्टर यांच्यासह सामाजसेविका मेधा पाटकर या देखील भारत जोडोशी जोडल्या जाणार आहेत. नांदेड जिल्ह्यात यात्रेचा चार दिवस मुक्काम असणार आहे.
पदयात्रेनंतर काॅर्नर मिटिंग देखील होतील. १० नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये नवा मोंढा येथे दुपारी साडेचार वाजता जाहीर सभा होणार आहे. जिल्ह्यात १२० किलोमीटर ही पदयात्रा असणार आहे. राज्यात या यात्रेचा मार्ग तीनशे किलोमीटरचा असणार आहे. हिंगोलीत देखील चार दिवस यात्रेचा मुक्काम राहणार असून या दरम्यान महाराष्ट्रात दोन जाहीर सभा होणार आहेत.
पैकी एक नांदेडमध्ये तर दुसरी शेगांवला. दररोज २४ किलोमीटरची यात्रा सकाळी सहा वाजता सुरू होईल. १२ किलोमीटर नंतर विश्रांती आणि नंतर दुपारी साडेतीन ते सात असा कार्यक्रम असेल, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले. या यात्रेच्या वृत्ताकंनासाठी देशभरातील प्रसार माध्यमांसोबतच नेदरलॅंडची प्रसार माध्यमे देखील येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.