भोकरदन ः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहबे दानवे हे राजकारणातील एक अवलिया व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. पुण्यात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी आपला फाटका शर्ट जाहीरपणे दाखवत आपल्या साधेपणाचा पुन्हा एकदा परिचय दिला. लोकांमध्ये मिसळणे, त्यांची बोली बोलणे आणि त्यांच्या सारखेच राहणे ही दानवे यांची खासियत. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहतात.
देशाच्या रेल्वेचा कारभार सांभाळत मराठवाड्यातून बुलेट ट्रेन नेण्याचे स्वप्न पाहणारे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे मात्र ट्रॅक्टरचे स्टेअरिंग हाती घेऊन मतदारसंघातील रस्त्यावर फिरत आहेत. भोकरदनमध्ये आज एका कार्यकर्त्याचा ट्रॅकटर काढून दानवे यांनी स्वतः चालवत नेला आणि पुन्हा त्यांच्या साधेपणाची चर्चा सुरू झाली. रेल्वे राज्यमंत्री पदाचा कारभार हाती आल्यापासून रावसाहेब दानवे जास्तकाळ दिल्लीतच असतात.
या शिवाय देशातील विविध राज्यात त्यांचे दौरे सुरू आहेत. त्यामुळे वेळ आणि संधी मिळेल तेव्हा ते पुन्हा आपल्या गावात, मतदारसंघात आणि घरी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये रमतात. दानवे नुकतेच दिल्लीतून भोकरदनला परतले. मंत्रीपदाचा बडेजाव न बाळगता रोजच्या प्रमाणे भेटीगाठी, गप्पा आणि मतदारसंघातील कामांवर ते लक्ष्य केंद्रीत करतात.
आज सकाळी एक कार्यकर्ता दानवेंच्या बंगल्यावर आपला ट्रॅक्टर घेऊन आला होता. तो ट्रॅकटर पाहून दानवेंना तो चालवण्याचा मोह काही आवरला नाही. तसं शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करतांनाचे दानवे यांचे फोटो यापुर्वी अनेकदा समोर आलेले आहे. बैलगाडी, ट्रॅकटर, शेतात स्वयंपाक, आणि घोड्यावरची रपेट असे अनेक रुप त्यांच्या समर्थक आणि मतदारसंघातील लोकांना नवे नाही.
पण आता केंद्रात रेल्वे सारख्या महत्वाच्या खात्याची जबादरारी आल्यानंतर दानवे यांच्या वागण्यात काही फरक पडतो की काय? असे वाटत होते, पण दिल्लीतील दानवे आणि मतदारसंघातील दानवे यांच्यात खूप फरक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. कार्यकर्त्यांच्या ट्रॅक्टरवर दानवे स्वार झाले, गेअर टाकला आणि ट्रॅक्टर थेट बंगल्याच्या बाहेर घेऊन त्यांनी भोकरदनच्या रस्त्यावरून चालवले.
बंगल्यापासून ते सिल्लोड रोडवरील आंबेडकर चौकापर्यंत त्यांनी या ट्रॅक्टरचे सारथ्य केले. कार्यकर्त्यालाही आपल्या नेत्याने ट्रॅकटर चालवल्याचा आनंद झाला. पण दानवेंच्या या ट्रॅकटर चालवण्याच्या हौसेमुळे त्यांच्यासाठी बंदोबस्तात असलेल्या यंत्रणेची मात्र चांगलीच धावपळ उडाली. दानवे यांचे हे ट्रॅक्टर प्रेम पाहण्यासाठी भोकरदनच्या रस्त्यावर चांगलीच गर्दी झाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.