Parbhani News : मागील २७ वर्षापासून आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि ठाकरेंचे एकनिष्ठ शिलेदार, परभणी लोकसभेचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी यंदाही पंढरपूरच्या वारी केली आहे. ही वारी करताना, त्यांनी पांडुरंगाच्या चरणी साकडं घातलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विराजमान व्हावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. माऊलींच्या वारीदरम्यान त्यांनी आपली ही भावना बोलून दाखवली. (Latest Marathi News)
खासदार जाधव म्हणाले, "शेवटी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जनता जनार्दन ठरवणार आहे. ज्या पद्धतीने आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं, ते पाहिल्यावर कुणालाही वेदना होतील. ज्या बाळासाहेबांनी एवढी मोठी संघटना स्थापन करून, सर्वांना लहानाचं मोठं केलं. जे आमच्या बघण्यात नाही, ते ही खाण्यात आलं. ते काही जणांना पचवता आलं नाही. त्यांच्यावर ज्या पद्धतीने वार झाले, आजही वार होत आहेत. हे पाहिल्यावर वाटतं की, आमचे नेते उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत, असं आमचं साकडं पांडुरंगाला आहे. पुढच्या आषाढी एकादशीला मी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणार."
"जे उद्धव ठाकरेंची साथ सोडून तिकडे गेलेत, त्यांचे ही फोन येतात. आम्ही अनेक वर्षे एकत्र कामे केली. एकनाथ शिंदे आणि मी एकत्र २००४ ला आमदार झालो. पक्ष सोडून गेलेल्यांच्या एक मनात अपराधीपणाची भावना आहे. पण ते वेगवेगळी कारण सांगतात. आमची कामं होत नव्हती. पण सगळ्यांना माहिती आहे की, हे ४० लोक कशामुळे तिकडे गेले. ईडी, सीबीआयच्या भीतीने काही गेले. कुणी खोक्याच्या आमिषाने गेले," असेही खासदार संजय जाधव म्हणाले.
"हल्लीच्या राजकारणात प्रचंड कटुता आलेली आहे. वैचारिक लढाई मी समजू शकतो. सत्तेसाठी सर्व काही या नीतीचा भारतीय जनता पार्टीने जो काही अवलंब केला आहे, हे फक्त समाजालाच नाही, एकद देश म्हणून ही आपल्यासाठी घातक आहे," अशीही खंत जाधव यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.