गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेला वैद्यनाथ साखर कारखाना आर्थिक अडचणीत सापडला असून उत्पादन थांबले आहे.
पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांनंतरही कारखाना वाचवण्यात अपयश आले, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांत नाराजी.
या घडामोडीमुळे बीडच्या राजकारणात आणि मुंडे घराण्याच्या प्रतिष्ठेत मोठा धक्का बसला आहे.
Sugar Factory News : राज्यातील सहकार क्षेत्रावर पूर्वीपासूनच काँग्रेस -राष्ट्रवादीच्या पुढार्यांचा विशेषत: पश्चिम महाराष्ट्राचा पगडा होता. भौगोलिक आणि नैसर्गिक दृष्ट्या ऊस उत्पादनासाठी पोषक नसलेल्या मराठवाड्यात कालांतराने साखर कारखाने सुरू करण्याचे धाडस करण्यात आले. लातूरच्या देशमुख कुटुंबाने मांजरा सहकार उद्योग यशस्वीरित्या सांभाळला आणि त्याचा विस्तारही केला. दिवंगत विलासराव देशमुख आणि त्यांच्यानंतर त्यांचे सख्खे बंधू दिलीपराव देशमुख यांनी या साखर उद्योग समूहाची पाळीमुळे घट्ट केली आणि हा वारसा पुढच्या पिढीच्या हातात दिला.
आज मराठवाड्यात मांजरा उद्योग समूह सोडला तर इतर सहकारी साखर कारखान्यांची अवस्था बिकट आहे. काही अवसायनात निघाले, काहींवर प्रशासक आहेत तर काही कारखाने भाडेतत्त्वावर चालवले जात आहेत. काही दिवसांपूर्वी लिलावातून विक्री झालेला परळीचा वैद्यनाथ साखर कारखाना सध्या चर्चेत आला आहे. गोपीनाथ मुंडे यांनी सहकार क्षेत्रात जम बसवण्यासाठी परळीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीची काही वर्ष कारखाना फायद्यात असल्याने गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे सहकारातील पाऊल यशस्वी ठरले, असे म्हटले गेले.
मात्र कालांतराने परिसरातील काही कारखाने भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेत विस्ताराचा केलेला प्रयत्न फायद्यात असलेल्या वैद्यनाथ कारखान्यालाही अडचणी घेऊन गेला. गोपीनाथ मुंडे यांच्या हातात सूत्र होती तोपर्यंत अडचणींवर मात करतही वैद्यनाथची वाटचाल सुरू होती. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर मात्र या कारखान्याची धुरा त्यांचा राजकीय वारसा सांभाळणाऱ्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि पुतणे धनंजय मुंडे यांना पेलवली नाही. दोघांच्या वादात वैद्यनाथला घरघर लागली. 1999 मध्ये पहिला हंगाम घेणाऱ्या वैद्यनाथ साखर कारखान्याचा प्रवास कर्जबाजारीपणामुळे 2025 मध्ये थांबला.
बँकेने कर्ज वसुलीसाठी कारखान्यावर जप्ती आणत त्याचा लिलाव केला आणि 132 कोटी रुपयांमध्ये ओंकार ग्रुपने हा कारखाना ताब्यात घेतला. साखर कारखाना पंकजा मुंडे यांनी विकला, असा आरोप बीड जिल्ह्यातील शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादकांनी केला आहे. थेट पंकजा मुंडे यांनी कारखाना विकला नसला तरी लिलाव पद्धतीतून तो ओंकार ग्रुपच्या ताब्यात गेला हे नाकारता येत नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर कारखान्याचे व्यवस्थापन न करता आल्याने ही वेळ आल्याचा आरोप सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून केला जात आहे .
स्थापनेनंतरच्या वर्षभरातच 22 कोटी रुपयांच्या फायद्यात असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना एवढा डबघाईस का आला? यामागे अनेक कारणं आहेत. सहकार क्षेत्रात जम बसत आहे असे वाटत असतानाच या अनुभवाच्या जोरावर गोपीनाथ मुंडे यांनी पारनेर, जगदंबा यासह यवतमाळ व धुळे जिल्ह्यातील दहा ते बारा कारखाने भाडेतत्त्वावर चालवायला घेतले. याचा फटका आणि भार वैद्यनाथ कारखान्यावरही पडू लागला. त्यातच 2012 आणि 2015 मध्ये मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीने ऊस लागवडीचे प्रमाण घटले आणि याचा फटका कारखान्याला बसला.
नोटीस, चोरीचे प्रकार
कर्ज आणि त्यावरील व्याज वाढत गेल्याने कारखान्याच्या अर्थचक्राला एक प्रकारे खीळ बसली. वैद्यनाथ कारखान्यात ऊस तापवण्याची टाकी फुटली आणि त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेने कारखान्याच्या विश्वासाहार्यतेवर प्रश्नचिन्ह उभे केले गेले. त्यानंतर कारखाना बंद झाला आणि अनेक प्रयत्न करूनही तो मुंडेंनंतरच्या पिढीला सुरू करता आला नाही. पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ताब्यात असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याला वस्तु सेवा कराची नोटीसही बजावण्यात आली होती.
विधानसभेतील पराभवानंतर पाच वर्ष सत्तेतून बाहेर फेकल्या गेलेल्या पंकजा मुंडे यांना साखर कारखाना सुरू करण्याचे शिवधनुष्य काही पेलवता आले नाही. बंद कारखान्यातील यंत्रसामग्रीची चोरी असे प्रकारही दरम्यानच्या काळात घडले. बँकेची थकबाकी, त्यावरील व्याज, कर्मचाऱ्यांची देणी दिवसेंदिवस वाढत चालल्याने साखर कारखाना पुन्हा उभा करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर पंकजा आणि धनंजय मुंडे यांनीही त्यात फारसा रस दाखवला नाही.
दरम्यान बँकांनी जप्तीची कारवाई आणि लिलावाची प्रक्रिया सुरू केली होती. ओमकार ग्रुपच्या बाबुराव बोत्रे पाटील यांनी अनेक आजारी साखर कारखाने खरेदी केले आहेत. त्यात आता परळीच्या वैद्यनाथ साखर कारखान्याची भर पडली आहे. 131 कोटी 98 लाख रुपया हा कारखाना ओंकार ग्रुपला विकण्यात आला आहे. गोपीनाथ मुंडे यांनी सहकारात जम बसवण्यासाठी टाकलेले हे पाऊल त्यांच्यानंतरच्या पिढीला मात्र पुढे नेता आले नाही, एवढे मात्र निश्चित.
1. वैद्यनाथ साखर कारखाना कोणी स्थापन केला होता?
गोपीनाथ मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना स्थापन केला होता.
2. सध्या कारखान्याची स्थिती काय आहे?
कारखाना आर्थिक अडचणीत असून उत्पादन ठप्प झाले आहे.
3. पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी कोणते प्रयत्न केले?
दोघांनी सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली, पण तोडगा निघाला नाही.
4. शेतकऱ्यांचा या विषयावर काय प्रतिसाद आहे?
शेतकरी नाराज असून शासन आणि मुंडे घराण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
5. या संकटाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
बीडमधील राजकीय समीकरणांवर आणि मुंडे घराण्याच्या प्रतिमेवर याचा थेट परिणाम होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.