बीड : विधानसभा निवडणुकीत बीड शहरातील चिखलमय रस्त्याने जेष्ठ नेते व मुरब्बी राजकारणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना फटका दिला. आता नगर पालिका निवडणुकीत याच चिखल आणि बीडमधील खड्ड्यांत कोणत्या क्षीरसागरांची गाडी स्लिप होणार? हे पहावे लागेल. नगर पालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी पडघम वाजायला सुरुवात झाली आहे.
त्यादृष्टीने सर्वत्र राजकीय पक्षांनी आखणीही सुरु केली आहे. ५० नगरसेवकांच्या बीड नगर पालिकेसाठी काका जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर तसेच आमदार संदीप क्षीरसागर पुन्हा एकदा आमने - सामने येणार आहेत. विशेष म्हणजे सध्या दोघे विरोधक असले तरी नगर पालिकेच्या सत्तेत डॉ. भारतभूषण क्षीरसागर नगराध्यक्ष तर संदीप क्षीरसागर यांचे बंधू हेमंत क्षीरसागर उपनगराध्यक्ष आहेत.
पण, शहरात आलेल्या एखाद्या विकास कामांच्या श्रेयाची मालकी दोघेही घेत असले तरी शहरातील खड्डे, तुंबलेल्या नाल्या, पाणी अशा अपयशांबद्दल कायम दोघेही एकमेकांकडे बोट दाखवतात. दरम्यान, क्षीरसागरांच्या राजकारणात बीड पालिकेची मनसबदारी कायम डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे असे. विविध समाजाशी असलेला कनेक्ट व राजकीय कौशल्याच्या बळावर त्यांनीही मागच्या ३० वर्षांहून अधिक काळ बीड पालिकेवर सत्ता टिकवून ठेवली आहे.
राज्यात सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहण्याचा विक्रमही त्यांच्याच नावे आहे. मागच्या निवडणुकीतही क्षीरसागर काका - पुतण्यांत राजकीय दुही निर्माण झाल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी निकराची लढत दिली. पण, जनतेतून नगराध्यक्षपदावर डॉ. भारतभूषण क्षीरसागर हेच निवडुण आले. आताही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने दोन्ही काका पुतण्यांनी तयारी सुरु केली आहे. मात्र, शहरातील अपूर्ण कामे, चिखल व खड्डेमय रस्ते यामुळे बीडकर संतप्त आहेत. पण, या संतापाचा फटका नेमका कोणाला बसणार हे लवकरच कळणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशीच शहरात अपूर्ण अमृत अटल योजनांच्या कामामुळे सर्वत्र खड्डे होते. नेमका याच दिवशी पाऊस झाला आणि बीडचे चिखल बीड झाले. त्यामुळे मतदानाला बाहेर पडणाऱ्यांच्या दुचाकी घसरुन पडत होत्या. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांच्याबाबत सहानुभूती असलेल्यांनीही रागाच्या भरात विरोधात पुतणे संदीप क्षीरसागर यांना मतदान केले. त्यामुळे शहरात कायम लिडवर असणारे जयदत्त क्षीरसागर मागे पडले आणि त्यांचा काठावरही पराभव झाला.
आताही या दोन्ही काका - पुतण्यांनी नगर पालिका निवणुकीची तयारी केली असली तरी शहरात डिपी प्लॅनमधून केलेल्या रस्त्यांचे दोन वर्षांतच तीन तेरा वाजल्यामुळे दर्जांबाबतही बीडकर चर्चा करत आहेत. अपूर्ण नाल्यांमुळे शहरात दुर्गंधी आणि घाण आहे. त्यामुळे रोगराईचे थैमान आहे. शहरभर एलईडीसाठी कोट्यावधी खर्च केले असले तरी ‘चिखल बीड’अनेक महिने अंधारात होते.
विशेष म्हणजे मोठ्या क्षीरसागरांना राजकारणात ओबीसी घटकासह दलित - मुस्लिम वर्गाची खंबीर साथ महत्वाची असे. पण, त्यांनी मागच्या लोकसभेला ऐनवेळी शिवबंधन हाती बांधले. बीड शहराची सामाजिक रचना पाहता त्यांना हाती शिवधनुष्य घेऊन बीड पालिकेचा गड सर करणे जिकरीचे जाणार आहे. त्यामुळे ते नगर पालिकेला चिन्हही कोणते वापरतात हेही महत्वाचे आहे.
दुसरीकडे संदीप क्षीरसागर यांच्याकडूनही बीडकरांच्या अपेक्षांचा भंग झाला आहे. कायम काकांच्या अपयशाकडे बोट दाखविणाऱ्या संदीप क्षीरसागर यांच्या अखत्यारित असलेल्या बीड - जालना व बीड - अहमदनगर हे शहरातील दोन रस्तेही खड्डेयमच आहेत. शहरात त्यांचा पुर्वीप्रमाणे टच नसून त्यांचे अनेक नगरसेवक साथीदारही त्यांच्यापासून दुरावलेले आहेत. आता त्यांना राष्ट्रवादीचे पाठबळ असले आणि राज्यात सत्ता असली तरी त्यांनी बीड शहरासाठी या काळात भरीव काही केलेले नाही. त्याचीही नाराजी त्यांना सहन करावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.