Latur Political News : लातूर जिल्ह्यात पक्षांतर्गत गटबाजी, जिल्ह्यातील आमदारांचे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असलेली तोंड या पार्श्वभूमीवर नव्याने संघटनात्मक बांधणी करत भाजपने लातूर शहराध्यक्षपदी अजित पाटील कव्हेकर या तरुण चेहऱ्याला संधी दिली. तर लातूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष पदावर काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांची निवड केली. तरुण चेहरा आणि अनुभवी नेतृत्व या दोघांची सांगड भाजपाने घातल्यामुळे हे दोघे लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला 'अच्छे दिन' आणतील का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत लातूरची जागा भाजपाने गमावली तर विधानसभा निवडणुकीत लातूर (Latur) शहरमध्ये पराभूत झाल्यानंतर लातूर ग्रामीणची जागा मात्र पटकावली. लातूर शहर मतदार संघामध्ये स्थानिक नेत्यांमधील गटबाजी आणि निलंगेकर, अभिमन्यू पवार आणि रमेश आप्पा कराड या तीन नेत्यांचे दुर्लक्ष पक्षाला चांगलेच महागात पडले. अन्यथा लातूर शहरची जागाही भाजपाने जिंकली असती. राज्यात महायुती 238 जागा निवडून आणत सत्तेवर आली. यात लातूर शहरची जागा वगळता पक्षाला जिल्ह्यात चांगले यश मिळाले.
मिळालेले हे यश टिकवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा नंबर वन करण्याचे आव्हान कव्हेकर आणि बसवराज पाटील यांच्यासमोर असणार आहे. भाजपाच्या संघटनात्मक निवडणुकांमध्ये पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळेच लातूर जिल्ह्यातील शहर आणि जिल्हा अध्यक्ष पदावरील नियुक्त्या रखडल्या होत्या. अखेर त्या दोन दिवसांपूर्वी जाहीर झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर (BJP) भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांना पक्षात कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चलबिचल होती.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल ही अपेक्षाही फोल ठरली. त्यानंतर विधान परिषदेवर वर्णी लागेल ही अशाही धुळीस मिळाली. परंतु लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पद देत भाजपने बसवराज पाटील यांची पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ग्रामीण भागात भाजपाला किती यश मिळते? यावर बसवराज पाटलांचे पुनर्वसन अवलंबून असेल, असेही बोलले जाते. तर लातूर शहरमध्ये महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकवण्याचे शिवधणुष्य अजित पाटील कव्हेकर यांना जिल्ह्यातील विरोधी दिशेला तोंड असलेल्या नेत्यांना एकत्रित आणून पेलावे लागणार आहे.
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत खासदार आणि विधानसभा निवडणुकीत लातूर शहरची जागा निवडून आणल्यामुळे काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास कमालीचा बळावला आहे. त्यामुळे आमदार अमित देशमुख यांनी शहरी भागातील नागरिकांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करत बैठकींचा धडाका सुरू केला आहे. संघटनात्मक निवडी रखडल्यामुळे भाजपामध्ये एक प्रकारची शिथिलता आली होती आता कव्हेकर आणि बसवराज पाटील यांच्या निवडीनंतर ती निघून जाईल, अशी अपेक्षा आहे. लातूर महापालिका ताब्यात घ्यायची असेल तर भाजपाच्या जिल्ह्यातील सगळ्या नेत्यांना एकत्र यावे लागेल. यासाठी राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनीही लक्ष घालावे लागणार आहे.
महापालिका हद्दीच्या अनुषंगाने लातूर शहरातील नागरिक सध्या पाण्याच्या प्रश्नावरून प्रचंड नाराज आहेत. पंधरा दिवसांना नळाला पाणी येते पण तेही काळे, पिवळे आणि अशुद्ध. या काळ्या पाण्याच्या शिक्षेतून आपली सुटका कोण करणार? याकडे ते डोळे लावून आहेत. बैठका घेऊन, अधिकार्यांवर फायरी झाडल्या म्हणजे आपले काम झाले, असा समज आमदार अमित देशमुख करून घेत असतील तर तो चुकीचा आहे. वर्षानुवर्षे पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या लातूरकरांची तहान सत्ताधारी आणि विरोधक कधी भागवणार? हा खरा प्रश्न आहे. बाहेरच्या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याचा फटकाही लातूरला बसतो आहे.
केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर चर्चा आणि बैठका घेऊन लातूरच्या पिवळ्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. हे पालकमंत्र्यांच्या कधी लक्षात येणार, असा सवालही या निमित्ताने विचारला जात आहे. एकूणच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेससह सत्ताधारी भाजप पक्षाला लातूरकर हे सगळे प्रश्न विचारून भंडावून सोडल्याशिवाय राहणार नाहीत एवढे मात्र निश्चित! भाजपने संघटनात्मक बांधणीतील पेच दूर करत जबाबदाऱ्या ठरवून दिल्या आहेत. आता या नव्याने जबाबदारी दिलेल्या पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील इतर नेत्यांनी प्रामाणिकपणे साथ देत पक्षाला 'अच्छे दिन' आणावेत हीच अपेक्षा सर्वसामान्य भाजप कार्यकर्ता बाळगून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.