मुंबई : राज्यात वाईन विक्रीच्या निर्णयावरून महाराष्ट्राला मद्यराष्ट्र होऊ देणार नाही म्हणत आंदोलन करणाऱ्या विरोधकांना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी फटकारले. (Ncp) महाराष्ट्रात सर्वाधिक दारूचे कारखाने, बार आणि दारूडे भाजपचेच असल्याचा हल्ला मलिक यांनी चढवला. भाजपला (Bjp) जर एवढीच काळजी असेल तर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दारू पिणार नाही, अशी शपथ घ्यायला लावावी, आणि ज्या नेत्यांचे, मंत्र्यांचे दारूचे कारखाने, बार आहेत, त्यांनी आपले परवाने सरेंडर करावेत, असा टोला देखील लगावला.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन महाविकास आघाडी सरकारने राज्यातील माॅल, किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला जात आहे. यावरून राज्यात सरकारवर टीकेची झोड उठली असून त्यात विरोधी पक्ष भाजप आघाडीवर आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुलीच वाईनरी कंपनीच्या संचालक असल्याचा आरोप देखील भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला होता.
त्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्टाला मद्यराष्ट्र होऊ देणार नाही, असे म्हणत वाईन विक्री निर्णयाविरोधात आज आंदोलन देखील करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर सडकून टिका केली.
प्रसार माध्यमांशी बोलतांना मलिक म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन व्रिकीला परवानगी देण्याच्या निर्णयावर आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पण या मुद्यावरून सरकारवर टीका करणाऱ्या भाजपच्या राज्यातील अनेक नेते, केंद्रीय मंत्र्यांचेच सर्वाधिक दारूचे कारखाने आणि बार आहेत.
एवढेच नाही तर सर्वाधिक दारूडे देखील याच पक्षाचे आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला मद्यराष्ट्र होऊ देणार नाही म्हणून रस्त्यावर उतरणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यांनी आधी आपल्या पक्षातील नेते, मंत्री यांना दारू कारखान्यांचे आणि बारचे परवाने सरेंडर करण्यास सांगावे. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मी दारू पिणार नाही, अशी शपथ घ्यावी, असा टोला लगावला.
महाराष्ट्रात आंदोलन करणाऱ्यांनी भाजपची सत्ता असलेल्या शेजारच्या मध्यप्रदेशचे मद्यराष्ट्र झाले ते आधी पहावे. तिथे तर घरातच बारला परवानगी देण्यात आली आहे. एवढेच नाही तर मोहाची दारू तयार करण्यावर कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी मध्य प्रदेशच्या मामाजीकडे जाऊन एकदा त्यांचा सल्ला घ्यावा, असेही मलिक म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.