
मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले एक देश एक निवडणूक हे विधेयक मंगळवारी लोकसभेत सादर केले जाणार असल्याचे वृत्त आहे. त्यासाठी भाजपने खासदारांना संसदेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे. या विधेयकाच्या माध्यमातून देशभरात लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकाचवेळी घेण्याचे प्रस्तावित आहेत. त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागणार आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारे हे विधेयक असणार आहे.
सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल झाले आहे. सीआयडीचे आयपीएस अधिकारी सचिन पाटील यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला सात दिवस पूर्ण होत आहेत. सीआयडीचे पथक दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता.16) विधिमंडळ अधिवेशनात संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास 'सीआयडी'कडे दिल्याची माहिती दिली होती. तसेच यावर 'एसआयटी' समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. या खून प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.
मुंबईत टाटासारखी चांगली अद्यायावत रुग्णालये आहेत, पण त्यावर भार जास्त आहे. बिहारसारख्या राज्यात दोन एम्स असून महाराष्ट्रात फक्त एकच आणि तेही नागपुरात आहे. त्यामुळे आता मुंबई उपनगरात 'एम्स'सारख्या इस्पितळाची आवश्यकता आहे. तिथे एम्स रुग्णालयाची निर्मिती होणे आवश्यक आहे,अशी मागणी शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांची लोकसभेत केली आहे.
महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या खातेवाटपावर आज सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. खाते वाटप कसे होणार, याकडे आता लक्ष लागले आहे. नागपूरमधील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. अधिवेशनात उद्या हा मुद्दा तापणार. असे चित्र आहे.
पोलिस कोठडीत असताना परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. सोमनाथ यांची उत्तरीय तपासणी छत्रपती संभाजीनगरमधील घोटी रुग्णालयात आज सोमवारी दुपारी इन कॅमेरा करण्यात आली. प्राथमिक अहवालात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंगावर जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आनंदराज आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने परभणी बंद आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात डावलले गेल्याने नाराज असून ते विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी झाले नाहीत. माजी मंत्री मनुगंटीवार भाजपमधील मोठे नेते आहेत. प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत पक्षात अनेक दिग्गज नेते आहेत. त्यात मुनगंटीवार यांचे पुनर्वसन कसे होणार याकडे आता लक्ष लागले आहे. सुधीर मुनगंटीवार हे विदर्भातील पक्षाचा मोठा चेहरा आहे.
मला अगोदर राज्यसभेवर जायचे होते. त्यावेळी जाऊ दिले नाही. अगोदर विधानसभा निवडणूक लढा. लढलो आणि जिंकलो. आता सात ते आठ दिवसापूर्वी मला राज्यसभेवर जाण्याचे सांगण्यात आले आहे. मी तो प्रस्ताव नाकारला आहे. राज्यसभेवर जाण्यापूर्वी मला विधानसभेचा राजीनामा द्यावा लागले. आता राज्यसभेवर गेलो, तर माझ्या मतदारांशी प्रतारणा होईल. ओबीसींसाठी लढलो, त्याचे मला आता बक्षीस देत आहेत. त्यावेळी गरज होती. घरं जाळली जात होती. मंत्रिपदाचा राजीनामा देऊन, मी ओबीसींसाठी मैदानात उतरलो होतो, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
केंद्र सरकार 'एक देश, एक निडवणूक विधेयक', उद्या संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे. आजच्या कामकाजात या विधेयकाचा समावेश नाही. एक देश, एक निवडणूक या धोरणाशी संबंधित विधेयके मांडण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे, असे सूत्रांची माहिती आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा हा अखेरचा आठवडा आहे.
महायुती मंत्रिमंडळात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोण? याची चर्चा सुरू आहे. रवींद्र चव्हाण, डॉ. संजय कुटे, संभाजी पाटील निलंगेकर, सुधीर मुनगंटीवार आणि राम शिंदे यांचा नावे, या पदाच्या शर्यतीत असतानाच, आता देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू प्रवीण दरेकर यांचे नाव देखील चर्चेत आले आहे.
"मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. पण मंत्रीपद किती वेळा आले अन् गेले, छगन भुजबळ संपला नाही. ज्यांनी मला मंत्रीपद दिले नाही, त्यांना विचारा. मी नाराजच आहे. मी अजित पवार यांच्याशी चर्चा केलेली नाही. मला त्याची गरज वाटली नाही", अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाडकी बहीण आणि ओबीसींमुळे महायुतीला यश मिळाल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे.
ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले आहे. भुजबळ देखील नाराज आहेत. या विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला असून बुलढाणा इथल्या सिंदखेडराजा इथं ओबीसी समाजाच्यावतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. तसेच नागपूर-पुणे या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आंदोलकांनी निषेध केला.
परभणीत संविधानाचा आपमान करणारा हा मनोरुग्ण आहे. तरी देखील त्यावर कारवाई झाली आहे. संविधानाचा अपमान कधीच सहन करणार नाही. परभणी, बीडमधील घटनेवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्याचा सरकारचा पुरेपुर प्रयत्न राहणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. परभणी आणि बीडमधील प्रकरणावर चर्चेची मागणी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केली होती. त्यावर फडणवीस यांनी हे उत्तर दिले.
'ईव्हीएम' हटवण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात विरोधकांची सुरवातीला बैठक झाली. यानंतर विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर 'ईव्हीएम'विरोधात आंदोलन सुरू केले. ''ईव्हीएम' हटवा, देश वाचवा', अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केले. विरोधकांच्या या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे.
मंत्रिमंडळात समावेश न झालेले आणि नाराज असलेले छगन भुजबळ विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होत आहेत. भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदुराव यांनी भुजबळांची भेट घेतली. नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. विधिमंडळातील कामकाजासाठी सहभागी होण्यासाठी चाललेल्या छगन भुजबळांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र दुपारी बारा वाजता त्यांनी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली आहे. या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते काय भूमिका मांडतात, याकडे लक्ष लागले आहे.
महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी काल नागपूरमधील राजभवनात झाला. यात 33 जणांना कॅबिनेट, तर सहा राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात असलेल्या 42 पैकी 18 नवे चेहरे आहेत. भाजपमध्ये 19, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नऊ मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांना येत्या दोन दिवसांत खाते वाटप निश्चित होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून, ते महाबळेश्वर इथं जाणार आहे. राहुल गांधी यांचा हा खासगी दौरा असणार आहे. राहुल गांधी पुण्यात काल रात्री मुक्कामाला होते. त्यानंतर ते आज सकाळी महाबळेश्र्वरला रवाना झाले आहेत.
नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारचे आजपासून अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात 20 विधेयक ठेवली जाणार आहेत. यातच परभणीमधील संतोष सूर्यवंशी यांचे मृत्यूप्रकरण आणि बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून अधिवेशन गाजणार, असे दिसते.
नागपूरमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. यावेळी विधिमंडळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला स्वतंत्र कार्यालय देण्यात आले आहे. शरद पवार यांचे दहा आमदार आहेत. मुंबईत झालेल्या पावसाळी आणि गेल्यावेळच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाला स्वतंत्र कार्यालय देण्यात आलेले नव्हते.
परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय युवकाचा न्यायालयीन कोठीडत मृत्यू झाल्यामुळे रविवारी परभणीसह नांदेडमध्ये तणाव होता. सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.