

Uddhav Thackeray Shiv Sena Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाची चिन्हं दिसू लागली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरू असलेल्या चर्चित ‘ऑपरेशन टायगर’ने आता निर्णायक टप्पा गाठल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या संभाव्य राजकीय हालचालींना रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने थेट दिल्लीमध्ये आक्रमक मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर लोकसभेतील (Lok Sabha) पक्षाचे नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवत संभाव्य फुटीबाबत गंभीर आक्षेप नोंदवला आहे. पक्षातील कोणताही कथित फुटीर गट किंवा स्वतंत्र गट निर्माण झाल्यास त्याला कोणत्याही प्रकारची स्वतंत्र मान्यता, विशेषाधिकार किंवा संसदीय सुविधा देऊ नयेत, अशी स्पष्ट मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे पक्षातील (Shiv Sena UBT) 9 पैकी तब्बल 6 खासदार मध्यरात्री अचानक दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या खासदारांच्या दिल्लीतील हालचालींनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील राजधानीत पोहोचल्याने ‘ऑपरेशन टायगर’ आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याच्या चर्चांना मोठं उधाण आलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हे सहा खासदार वेगवेगळ्या मार्गांनी दिल्लीत दाखल झाले आहेत. काही खासगी विमानाने तर काही विशेष विमानाने राजधानीत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ठाकरे गटातील खासदार स्वतंत्र गट निर्माण करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.
दिल्लीत पोहोचलेल्या या खासदारांची स्वतंत्र बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाजमाध्यमांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप करत म्हटलं की, “अपना सपना… मनी… मनी… महाराष्ट्रातील काही खासदारांना आज रात्री पक्षांतरासाठी प्रत्येकी तब्बल 15 कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे. हा प्रकार धक्कादायक आणि संतापजनक आहे.”
या सर्व राजकीय शक्यता लक्षात घेत ठाकरे गटाने आता कायदेशीर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केलं आहे की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला लोकसभेत अधिकृत नेता आणि व्हिपच्या माध्यमातून एकसंध राजकीय पक्ष म्हणून मान्यता कायम ठेवण्यात यावी.
तसेच, पक्षाचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही कथित गटाला किंवा फुटीर गटाला स्वतंत्र दर्जा किंवा मान्यता देऊ नये. भविष्यात अशा प्रकारची कोणतीही मागणी आल्यास पक्षाला स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय, पक्षाने संविधानातील दहाव्या अनुसूचीतील सर्व अधिकार स्वतःकडे राखून ठेवले असल्याचंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे. घटनात्मक तत्त्वांच्या विरोधात कोणतीही कृती झाल्यास आवश्यक त्या सर्व कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आधीच सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरू झालेल्या या गुप्त हालचाली आता नेमकं कोणतं नवं राजकीय समीकरण घडवतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.