Satara Dcc Bank Voting : सातारा जिल्हा बॅंकेसाठी चुरशीने 98 टक्के मतदान; गोरे, देसाई, पाटणकर, निंबाळकरांची प्रतिष्ठा पणाला, तीन तालुक्यांत 100 टक्के मतदान...

Satara Political News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बारा जागांसाठी ९७.९० टक्के मतदान झाले. जयकुमार गोरे, शंभूराज देसाई यांच्यासह प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
Satara Dcc Bank Voting
Satara Dcc Bank Voting sarkarnama
Published on: 
Updated on: 

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १२ जागांसाठी आज (ता. ०१ नोव्हेंबर) जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रांवर चुरशीने मतदान झाले. सायंकाळी पाचपर्यंत ९७.९० टक्के मतदान झाले. एकूण दोन हजार २१ मतदारांपैकी एक हजार ९८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महायुती सरकारचे दोन मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शंभूराज देसाई, संजीवराजे निंबाळकर, समशेरसिंह निंबाळकर, सत्यजित पाटणकर, शेखर गोरे यांच्यासह मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येत्या मंगळवारी (ता. ३ नोव्हेंबर) कोण गुलाल उधळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी नऊ जागा उमेदवारी अर्ज मागे घेताना बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित बारा जागांसाठी मतदान प्रक्रिया जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील मतदान केंद्रांवर पार पडली.

खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह सातारा तालुक्यातील मतदारांनी तंत्र निकेतनच्या मतदानातून केंद्रात जाऊन मतदान केले. सकाळी आठ वाजता मतदानास सुरुवात झाली. नऊ वाजल्यानंतर मतदान केंद्रावर गर्दी वाढू लागली होती. सकाळी दहापर्यंत २२.४४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी बारापर्यंत ६१.५० टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला. दुपारी दोन पर्यंत ८८.५० टक्के मतदान झाले. प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन उमेदवार भेटी देत होते.

दुपारी चारपर्यंत ९६ टक्के मतदान झाले होते. दोन हजार पैकी एक हजार ७९६ मतदारांनी मतांचा अधिकार बजावला होता. शेवटच्या तासभरात मतदानासाठी अनेकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न नेत्यांसह उमेदवारांचा सुरू होता. सायंकाळी पाचपर्यंत ९७.९० टक्के मतदान झाले. निवडणुकीत झालेल्या मतदारांपैकी एक हजार ८१८ पुरुष आणि १६१ स्त्री मतदारांनी मतांचा अधिकार बजावला आहे. मतमोजणी मंगळवारी सकाळी आठ वाजता जिल्हा सहकार बोर्डाच्या सभागृहात होणार आहे.

दरम्यान, फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर, रणजितसिंह नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, समशेर निंबाळकर, वाईत मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले, वेदांतिकाराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांनी तर माणमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे शेखर गोरे, कर्हाडला उदयसिंह पाटील, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, पाटणला पालकमंत्री शंभूराज देसाई, सत्यजित पाटणकर, जावळीत ज्ञानदेव रांजणे, विठ्ठल गोळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सुनील माने, सुनील खत्री, यांच्यासह दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला.

तीन तालुक्यांत १०० टक्के मतदान

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीतील मतदान चुरशीने झाले. अटीतटीच्या लढती होणाऱ्या तालुक्यात कोरेगाव, वाई आणि खंडाळा तालुक्यांत शंभर टक्के मतदान झाले, तर सातारा, कऱ्हाड आणि पाटण तालुक्यांत ९८ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले.

मतदार बसमधून थेट मतदान केंद्रावर दाखल

गेल्या महिना दोन महिन्यांपासून मतदार फुटू नयेत, यासाठी राजकीय नेत्यांनी परराज्यात मतदारांना सुरक्षित ठिकाणी नेले होते. निवडणुकीच्या मतदानादिवशी आज सकाळपासूनच मतदारांना खासगी बसमधून मतदानाच्या ठिकाणी आणून एकदम मतदान प्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे मतदान फुटण्याचा धोका टाळण्याचा प्रयत्न नेत्यांकडून करण्यात आला.

सहा टेबलांवर दोन फेऱ्यांत मतमोजणी होणार

सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे सभागृह, जरंडेश्वर नाका, हनुमान मंदिराजवळ, सातारा येथे मतमोजणी होणार आहे. सहा टेबलांवर दोन फेऱ्यांत मतमोजणी पूर्ण केली जाईल. मतमोजणीसाठी केवळ निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनाच प्रवेश असेल. प्रतिनिधींनी आठ-अ नमुन्यातील अर्ज सादर करणे आणि ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.

तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे

सातारा : ९८.७३ टक्के

जावळी ९४.२०

महाबळेश्वर ९०.२०

कर्हाड : ९८.२१

पाटण : ९८.९९

कोरेगाव : १००

खटाव : ९६.६६

माण : ९६.७४

खंडाळा : १००

वाई : १००

फलटण : ९६.१९ टक्के

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.