सातारा : सातारा पालिका चतुर्थ वार्षिक कर आकारणीच्या नोटिसा नागरिकांना देण्यास सुरुवात केली आहे. नोटिसांमधील कर मागणी अवाजवी असून ही प्रक्रिया स्थगित करत लोकनियुक्त कार्यकारिणी अस्तित्वात आल्यानंतर त्यावर कार्यवाही करावी, अशी आमची मागणी आहे. याबाबत आम्ही निवेदन दिले असून अपील सुनावणी पुढे न ढकलल्यास आंदोलन करण्याचा इशारा सोमवारी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिका आवारात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. (Shivendraraje Bhosale Latest News)
यापूर्वी त्यांनी बापट यांच्याशी चर्चा केली. यावेळी जयेंद्र चव्हाण, जयवंत भोसले, अशोक मोने, अविनाश कदम, भारत भोसले, विश्वतेज बालगुडे, विकास देशमुख, आशितोष चव्हाण, फिरोज पठाण, बाळासाहेब महामुलकर, शशिकांत पारेख, शेखर मोरे-पाटील यांच्यासह सातारा शहर, शाहूपुरी, विलासपूर तसेच विस्तारित भागातील मिळकतधारक उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ही प्रक्रिया स्थगित करावी, यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून तसा आदेश लवकरच येईल. यासाठीची प्रक्रिया सुरू असतानाही पालिका प्रशासनाने नागरिकांना नोटिसा पाठवत सुनावणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. किती करवाढ केलीय, विस्तारित भागात किती कर आकारणी झालीय, याची कोणतीही ठोस माहिती नागरिकांना देण्यात आलेली नाही. यामुळे ही प्रक्रिया स्थगित करावी, अशी आमची मागणी असल्याचे सांगत त्यांनी बापट यांना नगर विकास आघाडीच्या वतीने निवेदन दिले.
यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, घरपट्टीच्या नोटिसा बजावल्यानंतर पालिका प्रशासनाने घाईत सुनावणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. लोकनियुक्त कार्यकारिणीची मुदत संपल्याने त्यासाठीची समितीच अस्तित्वात नाही. समिती नसल्याने सुनावणी कोण घेणार, कशी घेणार, याविषयी शंका आहे. प्रशासक असला म्हणजे सत्ताधाऱ्यांची जबाबदारी संपली, असे म्हणता येत नाही. कुठे आहेत नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती? बिले, टेंडर घेण्यासाठीच ते पालिकेत येतात का? पालिकेची तिजोरी रिकामी आहे. ठेकेदारांची बिले रखडलीत. ती बिले काढण्यासाठी, पार्टी फंड जमविण्यासाठीच हे सगळं सुरू आहे.
चतुर्थ वार्षिक पाहणीसाठी शिपाई नेमले होते. चुकीच्या पध्दतीने पाहणी करत चुकीची कर मागणी होतेय. याविषयी ‘नविआ’ आणि शहर भाजप नागरिकांना मदत करत आहे. कमिशनराजमुळे पालिकेच्या सोयी-सुविधांचा बोजवारा उडाला आहे. शहरातील रस्ते पॅचिंगची कामेदेखील अत्यंत सुमार आहेत. काही कामांसाठी मुख्याधिकाऱ्यांना फाईली घेऊन पुण्याला बोलावण्यात येते मग घरपट्टीच्या अनुषंगाने का बोलत नाहीत, असा प्रश्न करत शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजेंवर टीका केली. ठेका आणि मर्जीतल्या ठेकेदारासाठीचे काही प्रकार पालिकेत सुरू आहेत.
दरम्यान, ठेका आणि कमिशनमुळे साताऱ्यातील विकासकामे नित्कृष्ट दर्जाची होत आहेत. भुयारी गटारासाठी सुरू असणाऱ्या खोदाईवर नाराजी व्यक्त करत विस्तारित भागातील गैरसोयी, असुविधांबाबतदेखील शिवेंद्रसिंहराजेंनी पालिका प्रशासन आणि ‘साविआ’वर टीका केली. आमच्या या भेटीबाबबतची माहिती मिळाल्याने रात्री घाईगडबडीत उदयनराजेंनी पत्रक काढल्याचेही त्यांनी यावेळी सांगत उदयनराजेंवर टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.