Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रेमाने एकेकाळी अश्रू ढाळणारे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पवार यांची साथ सोडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटात सामील झाले. पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून मुश्रीफ यांची ओळख होती. मात्र त्यांनी शरद पवार यांची साथ सोडल्याने अनेकांनी मुश्रीफ यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्यावर आता खुद्द शरद पवार हेच मुश्रीफ यांना उत्तर देतील, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. (Latest Marathi News)
राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत 25 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील दसरा चौक येथे कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पाहण्यासाठी ते कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. एकप्रकारे हे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात मोर्चेबांधणी असणार आहे.
वैद्यकीय कारणास्तव जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे अजितदादांच्या गटात जाण्याची चर्चा आहे. या चर्चेला अनुसरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्त्वपूर्ण विधान केला आहे. नवाब मलिक यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ते सध्या कोणत्याच राजकीय विषयावर बोलायला तयार नाहीत. पण अशावेळी राजकीय बोलून, मी त्यांना अडचणीत आणणार नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
कोल्हापुरात होणाऱ्या सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज असणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून तेच उमेदवार असतील, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. त्यावर जयंत पाटील यांनी खुलासा केला. लोकसभेची तशा पद्धतीची चर्चा अजून तरी झालेली नाही. त्याबद्दल निर्णय झाल्यास आम्ही नक्की कळवू. पण जे आवश्यक आहे, जे होणार आहे ते करावेच लागते, असे सूचक वक्तव्य करून एकप्रकारे श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्षपणे ग्रीन सिग्नल दिला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. तो राष्ट्रवादीनेच लढावा अशी आमची इच्छा आहे.
शरद पवार ओबीसी नेत्यांना टार्गेट करत आहेत, हा गैरसमज काहीजण पसरवत आहेत. पवार महाराष्ट्रभर सभा घेणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आग्रह केल्याने कोल्हापुरात सभा होत आहे. यापुढे जळगाव आणि पुणे येथे सभा होणार आहे. त्यामुळे पवार साहेबांच्या बद्दल गैरसमज पसरवण्याचे काम चुकीचं होत आहे, असे जयंत पाटील म्हणाले
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.