Ahilyanagar News: 'आम्ही आयुष्यात कधीच एवढं पाणी पाहिलं नव्हतं....'

Ahilyanagar farmers crop loss compensation news: अहिल्यानगर तालुका, कर्जत, श्रीगोंदे आदी तालुक्यांना पाण्यासाठी भांडावे लागते. या वर्षी मात्र नेमकी या दुष्काळी पट्ट्यातच अतिवृष्टी झाली. ज्येष्ठ मंडळी सांगतात, ‘आम्ही आयुष्यात कधीच एवढं पाणी पाहिलं नव्हतं.’’
Ahilyanagar farmers news
Ahilyanagar farmers newsSarkarnama
Published on
Updated on

संकटाची मालिका ही शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली. कोरड्या दुष्काळात पाण्यासाठी वणवण, ओल्या दुष्काळात पुराने धावपळ. एखाद्या वर्षी चांगलं पीक साधलं, तर ढासळलेल्या शेतीमाल दराचा प्रश्न. कसंही नुकसानच...त्यात यंदा अतिवृष्टीने कहर केला. पिके वाहून गेली. शेतीत ओढा घुसला. बांध तुटले.

लेकरांप्रमाणे लाडकी जनावरे डोळ्यांदेखत हंबरडा फोडत वाहून गेली. काही पाण्यात बुडून मेली. शेतकऱ्यांचं नशीबच वाहून गेलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव व जामखेड तालुक्यांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कितीही भरपाई मिळाली तरी हे नुकसान भरून निघणे अशक्य आहे.

अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्रात क्षेत्रफळाने मोठा. त्याचे भौगोलिकदृष्ट्या दोन भाग पडतात. उत्तर व दक्षिण. उत्तरेत दरवर्षी चांगला पाऊस पडतो. दक्षिणेत दुष्काळसदृश स्थिती असते. उत्तरेत भंडारदरा, मुळा, निळवंडे अशी मोठी धरणे आहेत. ती दरवर्षी भरतात. दक्षिणेत पाऊसच कमी. त्यामुळे मोठे धरणे नाहीत. एकूणच दक्षिण भाग कायम दुष्काळी पट्ट्यात असतो. विशेषतः पाथर्डी, शेवगाव, जामखेड, पारनेर, अहिल्यानगर तालुका, कर्जत, श्रीगोंदे आदी तालुक्यांना पाण्यासाठी भांडावे लागते. या वर्षी मात्र नेमकी या दुष्काळी पट्ट्यातच अतिवृष्टी झाली. ज्येष्ठ मंडळी सांगतात, ‘आम्ही आयुष्यात कधीच एवढं पाणी पाहिलं नव्हतं.’’

तत्पर मदतीमुळे जीव वाचले

२०, २१ सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेवगाव, पाथर्डी, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यांत महापूर आला होता. प्रशासनाच्या तत्पर मदतकार्यामुळे २२७ पूरग्रस्तांची सुटका करण्यात आली. स्थानिक प्रशासन, महसूल विभाग, महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने रात्रंदिवस एक केला. सगळे आपत्तिग्रस्तांसाठी धावून गेले.

जिल्ह्यातील २४ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अहिल्यानगर (कापूरवाडी, केडगाव, भिंगार, चिचोंडी, चास), श्रीगोंदे (मांडवगण, कोळेगाव), कर्जत (मिरजगाव), जामखेड (जामखेड, खर्डा, नान्नज, नायगाव, साकत), शेवगाव (बोधेगाव, चापडगाव, मुंगी), पाथर्डी (पाथर्डी, माणिकदौडी, टाकळी, कोरडगाव, करंजी, तिसगाव, खरवंडी, अकोला) अशा मंडळांच्या गावांत तब्बल ७० ते १५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Ahilyanagar farmers news
Rahul Gandhi: राहुल गांधींचा 'मत चोरी'चा आरोप सिद्ध, पुरावेच सापडले; 'व्होट चोरांचे' मोबाईल भाजप कार्यकर्त्याचेच!

अहिल्यानगर महानगरपालिका अन् जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकांनी सारोळा बद्दी, जामखेड-पाथर्डी बाह्यवळण रस्‍त्यावर पाण्यात अडकलेल्या दोन बसमधील ७० जणांची सुटका केली. दुसऱ्या दिवशीही पावसाने तांडव केले. प्रशासनाच्या तत्परतेमुळे ९१ पूरग्रस्तांची सुटका करण्यात आली. १३१ कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे लागले. जामखेड व कर्जत या तालुक्यांतही गंभीर स्थिती होती. जामखेड तालुक्यातील तरडगावमध्ये खैरी नदीच्या पुरामुळे दौंडाची वाडी रस्त्यावर अडकलेल्या सात जणांची सुटका करण्यात आली.

पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव व सोमाठाणे येथे १५ जणांना पुरातून बाहेर काढण्यात आले. शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथे प्रसूती वेदना सुरू झालेल्या महिलेला सुरक्षितपणे रुग्णालयात हलविले. कर्जत व शेवगाव तालुक्यातील निंबोडी, तरडगाव, मलठण, सीतपूर, आखेगाव व भगूर या गावांतील १३१ कुटुंबांतील सुमारे ४६५ नागरिक, १४९ जनावरे जनावरांना तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले. पाथर्डी तालुक्यात २० सप्टेंबरला शिरपूर येथे वाहून गेलेल्या अतुल रावसाहेब शेलार यांचा मृतदेह तिसऱ्या दिवशी आढळला.

सीनामाई कोपली

जामखेड तालुक्यात सीना नदीकाठच्या काही गावांतील शेतीच वाहून गेली. एका शेतकऱ्याची चार एकर शेतजमिनीची बहुमोल मातीच पुरात वाहून गेली. तेथे ओढ्याचे स्वरूप आले. आता त्या शेतकऱ्याने या शेतीत माती भरायची कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हीच स्थिती सीनाकाठच्या अनेक शेतकऱ्यांची झाली आहे.

याबरोबरच सीना नदीने अतिक्रमणधारकांनाही चांगलीच अद्दल घडविली आहे. नदीपात्रातील शेती पूर्णपणे गिळंकृत करून टाकली आहे. वर्षानुवर्षे शेती कसणाऱ्या या शेतकऱ्यांना दाद कोठेच मागता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली. सीनामाई कोपून तिचे उग्र रूप या पिढीने प्रथमच पाहिले. त्यामुळे भविष्यात सीनापात्र, पूरनियंत्रण रेषा असे प्रश्न अधिक गंभीर होणार आहेत.

कर्जमाफीचे काय?

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाल्याने संबंधित आमदार, मंत्री यांनी दौरे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. त्याप्रमाणे सर्वच नेते पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी धावले. जिल्ह्यात पूरग्रस्तांच्या स्थितीची पाहणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी परिसर पिंजून काढला. आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार रोहित पवार आदींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अश्रू पुसण्याचे काम केले.

प्रत्येकाने ‘योग्य प्रकारे पंचनामे करू,’ असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली. सरकार कर्जमाफी करणार, असे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिले असले, तरी कशी, केव्हा, याबाबत प्रश्न तसाच राहिला आहे. खरं तर शेतकऱ्यांना लगेचच मदतीची गरज आहे. ज्यांचं घर पूर्णपणे कोसळले, त्यांना निवारा देण्याची गरज आहे. गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या वाहून गेल्या. त्यांना तातडीने रोजीरोटीसाठी उत्पन्नाचे साधन देणे आवश्यक आहे. उभे पिके गेली, त्यासोबत मातीही वाहून गेली. दुसरी पेरणी करणार कुठे? असा प्रश्न अनेकांसमोर आहे. या शेतकऱ्यांना तुटपुंजी भरपाई देण्यापेक्षा त्यांची शेती पूर्वीप्रमाणे कशी होईल, यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे.

तुटपुंज्या निधीने बोळवण?

केंद्र शासनाकडून पंधराव्या वित्त आयोगांतर्गत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) वितरित केला जातो. त्यासाठी केंद्र शासनाने काही निकष आणि दर ठरवून दिलेले आहेत. राज्य शासनाकडून या निकषांप्रमाणेच आपत्तीकाळात नुकसानभरपाईचे वितरण करण्यात येते. संबंधित खात्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा नुकसान भरपाईसाठी पंचनामा करतात.

हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने विभागीय आयुक्तांमार्फत राज्य शासनाकडे पाठविला जातो. त्यानंतर मदत निधी देण्याबाबत विचारविनिमय होतो. ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत शेतकऱ्याला जगणे मुश्कील होणार आहे. मदत जाहीर करताना अत्यल्प निधी दिला जाणार आहे.

आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यास वारसांना चार लाख दिले जातील. अपंगत्व आल्यास ७४ हजार मिळतील. दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी घर पाण्यात बुडल्यास प्रति कुटुंब अडीच हजार रुपये मिळणार आहेत. सखल भागातील घराचे पूर्णत: नुकसान झाल्यास पक्क्या किंवा कच्च्या घरांसाठी एक लाख २० हजार रुपये मिळतील.

दूध देणाऱ्या जनावरांचा मृत्यू झाल्यास ३७ हजार ५००, तर बैलांसाठी ३२ हजार, वासरांसाठी २० हजार, शेळी, मेंढीसाठी चार हजार, प्रति कोंबडी शंभर रुपये दिले जाणार आहेत. जिरायत पिकांचे नुकसान झाल्यास हेक्टरी आठ हजार ५००, सिंचनाखालील जमिनीतील पिके १७ हजार, शेतजमिनीचे नुकसान झाल्यास १८ हजार, तर शेतजमिनीची माती वाहून गेल्यास ४७ हजार मिळणार आहेत. या तुटपुंज्या निधीने नुकसानीचा कोणता कोपरा भरून निघणार, हे शेतकरीच सांगू शकतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com