

सोलापूर, (ता. 3) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर शहराच्या राजकारणात बारकाईने लक्ष घातले आहे. पक्ष संघटनेचा दांडगा अनुभव असलेले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर सोलापूरच्या संपर्कमंत्रीपदाची व विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यावर सहसंपर्क मंत्रीपदाची जबादारी आहे. या दोन दिग्गज नेत्यांच्या अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा होईल. महापालिकेच्या 102 जागा आम्ही स्वबळावर लढणार असून यातील 75 जागांवर आम्ही विजयी होऊ, तशी आम्ही रणनीती आखली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी दिली.
जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार आणि मंत्री असा राजकीय प्रवास केलेले मंत्री भरणे आणि मोहोळमधून पिंपरी-चिंचवडमध्ये तीन वेळा नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती, तीनवेळा आमदार व विधानसभा उपाध्यक्ष असलेले अण्णा बनसोडे असे दोन दिग्गज नेते सोलापूर राष्ट्रवादीला लाभले आहेत. जनमानसातील प्रभावी कार्यकर्ता क्षणात हेरण्याचा हातखंडा या भरणे व बनसोडे या दोन्ही अनुभवी नेत्यांकडे आहे.
सोलापूर शहराच्या राजकारणात भाजपला पर्याय काय? हा प्रश्न सर्वचजण विचारत आहेत. भाजपला पर्याय देण्यासाठी आवश्यक असलेली सर्व रणनिती, तयारी आम्ही करत आहोत. महापालिकेच्या 75 जागा जिंकण्यासाठी कोणाला सोबत घ्यावे लागेल, याचा बारकाईने अभ्यास सुरू असल्याचेही शहराध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले.
सोलापूर शहराची सामाजिक रचना विचारात घेऊन आम्ही या निवडणुकीत प्रभावी सोशल इंजिनिअरिंग करत आहोत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त तरुण आणि महिलांना संधी दिली जाणार आहे. इलेक्टिव्ह मेरिट आणि जनमानसातील स्थान असलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वार्थाने सर्व शक्ती लावणार आहे. उपमुख्यमंत्री पवार (Ajit Pawar) यांनी अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेले प्रभावी निर्णय, लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी केलेले काम, या सर्वांचा मोठा लाभ महापालिकेच्या निवडणुकीत आम्हाला होईल, असा विश्वासही शहराध्यक्ष पवार यांनी व्यक्त केला आहे.
माजी उपमहापौर विष्णू निकंबे, अप्पाशा म्हेत्रे, सुधीर खरटमल या नेत्यांचे प्रवेश काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत झाले आहेत. महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतसे आणखी मोठे प्रवेश राष्ट्रवादीत झाल्याचे दिसतील, अशी माहितीही शहराध्यक्ष पवार यांनी दिली. यंदाच्या महापालिका निवडणुकीत आम्ही साम, दाम, दंड, भेद यासह सर्व ताकद लावून आम्ही मैदानात उतरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक तौफिक शेख, माजी नगरसेवक किसन जाधव यांच्यामुळे सोलापुरात राष्ट्रवादीची (NCP) ताकद आहेच. या शिवाय आणखी मास लिडर पक्षासोबत जोडण्यासाठी मी व कार्याध्यक्ष जुबेर बागवान आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्या सर्वांच्या एकीचे फळ म्हणून महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा मोठा विजय झालेला दिसेल, असा विश्वासही शहराध्यक्ष पवार यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.