Ajit Pawar Group : अजितदादांनी जयंत पाटलांच्या गडात पेरला सुरुंग, बत्ती लावताच धमाके सुरू

Ajit Pawar Gat vs Sharad Pawar Group Jayant Patil Sangli : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांचे जयंत पाटलांना धक्के...
Ajit Pawar, Jayant Patil
Ajit Pawar, Jayant Patil sarkarnama
Published on
Updated on

अनिल कदम -

एकेकाळी सांगली आणि मिरज शहर हे काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतर नेते जयंत पाटील यांनी सांगलीत लक्ष घातले. राष्ट्रवादी शून्यातून वाढवली. भाजपशी सलगी करत महाविकास आघाडी स्थापन करून महापालिकेत सत्ता स्थापन केली. परंतु आज महापालिका क्षेत्रातील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पकड ढिली झाल्याचे त्यातून स्पष्टपणे दिसत आहे. अजित पवार यांनीही सांगलीत विशेष लक्ष घातल्याचे दिसत आहे.

वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांच्यानंतर सांगली जिल्ह्याला डॉ. पतंगराव कदम, जयंत पाटील, आर. आर. पाटील यांच्यारूपाने खंबीर नेतृत्व मिळाले. संपूर्ण जिल्ह्याच्या अपेक्षा त्यांच्याकडून होत्या. त्यांनी या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नपूर्वक कामही केले. जयंत पाटील यांनी सांगली महापालिका क्षेत्रात महाविकास आघाडीचा प्रयोग केला. त्यामुळे पाटील यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या.

महापालिकेत मदन पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तेला हादरा देत त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता आणली. इथला व्यापार वाढेल, उद्योग-व्यवसाय वाढतील, अशी आशाही निर्माण झाली. मात्र अपेक्षित यश येताना दिसले नाही. महापालिकेतील सत्ताही शाबूत ठेवता आली नाही. एवढेच नव्हे, तर पक्ष, संघटना वाढीवरही मर्यादा आल्या. काही कार्यकर्त्यांवर अंधळा विश्वास ठेवल्याने इतर अनेकजण दुखावले. त्याचा परिणाम तसेच राज्यातील बदललेली सत्ता याचाही परिणाम Sangli त सुरू झाला आहे.

Ajit Pawar, Jayant Patil
Sangli Loksabha : ‘विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली सांगली लोकसभा लढणार; यंदा कोणतीही कसर ठेवणार नाही’

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंडखोरी करून सवतासुभा निर्माण केला. भाजपबरोबर आघाडी करून सत्तेत भागीदारी मिळवली. त्यावेळी सांगली जिल्ह्यातून विशेष महापालिका क्षेत्रातून त्यांच्या हाताला विशेष काहीच लागले नाही. मात्र, अजित पवार यांनी प्रयत्न थांबवले नाहीत. माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्यानंतर माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी हे अजित पवार गटात गेले.

महापालिका क्षेत्रात पक्षातील एकाधिकारशाहीकडे लक्ष वेधत अनेकांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली. अनेकांच्या तोफा नाराजीच्या दारुगोळ्यांनी भरलेल्या होत्या. केवळ बत्ती लावण्याचे काम शिल्लक होते. ते काम राष्ट्रवादीतील फूट पडल्याने सुरू झाले आहे.

महापालिकेच्या 2018 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 15 उमेदवार निवडून आले. यामध्ये सांगली शहर व उपनगरांतून 3, कुपवाडमधून 4 आणि मिरजेतून 8 उमेदवार निवडून आले. दिग्विजय सूर्यवंशी, मनगू सरगर, पवित्रा केरिपाळे हे सांगली शहर व उपनगरांतून निवडून आले. त्यापैकी सूर्यवंशी हे अजित पवार गटात गेले आहेत.

केरिपाळे यांनी स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजपला साथ देऊन आपला पवित्रा यापूर्वीच स्पष्ट केलेला आहे. सरगर यांनी जयंतराव पाटील यांच्यावरील निष्ठा अजून तरी ढळू दिलेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी नगरसेवक शेडजी मोहिते, विष्णू माने हे जयंतराव पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र बुधवारी मुंबईत अजित पवार यांच्या भेटीला गेलेल्यांमध्ये बागवान, माने यांचा समावेश होता. अजित पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधला नसल्याचे मोहिते यांनी स्पष्ट केले आहे. मात्र मिरजेत झालेल्या बैठकीला आणि अजित पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याच्या निवासस्थानी चर्चेवेळी ते होते.

मिरजेचे राष्ट्रवादीचे नेते व माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचे ज्येष्ठ बंधू जमिल बागवान हे नुकतेच अजित पवार गटात डेरेदाखल झाले. तत्पूर्वी अतहर नायकवडी आणि योगेंद्र थोरात यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. आता मैनुद्दीन बागवान यांनीही मुंबई गाठून अजित पवार यांची भे घेतली.

दरम्यान, मिरज आणि कुपवाडमधील 14 माजी नगरसेवकांचा लवकरच अजित पवार गटात प्रवेश होणार आहे. त्यातून पुढील राजकीय वाटचालींचा सहज अंदाज येतो. महापालिका क्षेत्राच्या राजकारणावरील जयंत पाटील यांची पकड ढिली होत असताना, अजित पवार यांची पकड मजबूत होत असल्याचे दिसत आहे. या बाबींकडे जयंत पाटील कसे पाहणार आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Ajit Pawar, Jayant Patil
Sharad Pawar On Ray Nagar : 'रे नगर'चे खरे श्रेय कोणाला? शरद पवारांनी स्पष्टच सांगितले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com