Anna Hazare
Anna HazareSarkarnama

काल रात्रीपर्यंत उपोषणावर ठाम असलेले अण्णा सकाळी म्हणतात, "मी ५० टक्के समाधानी"

ठाकरे सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर राज्यभर अनेकांनी त्याला विरोध केला आहे.
Published on

अहमदनगर : किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध म्हणून आंदोलन करायचे की नाही याचा निर्णय आपण रविवारी घेणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले आहे. उद्यापासून या निर्णयाच्या विरोधात प्राणांतिक उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र त्यांच्या इशाऱ्यानंतर राज्य उत्पादन शुल्कच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेतून आपले ५० टक्के समाधान झाल्याचे सांगत उपोषणासंबंधी रविवारी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे अण्णा हजारेंनी सांगितलं आहे.

ठाकरे सरकारने (Thackeray Government) काही दिवसांपूर्वी सुपरमार्केटमध्ये वाईन (Wine) विक्रीला परवानगी दिली आहे. मात्र या निर्णयाला राज्यभरातील अनेक लोकांसह, भाजप आणि इतर सामाजिक-राजकीय संघटनांनी त्याला विरोध केला आहे. अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनीही हा निर्णय मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. तसेच त्यांनी आमरण उपोषण (Indefinite Hunger Strike) करण्याचा इशाराही दिला होता.

अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना ३ फेब्रुवारी रोजी पत्र पाठवले होते. त्यानंतर ८ दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्रही पाठवले. या पत्रामध्ये त्यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. हजारे यांनी म्हटले होते की, मी मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविले मात्र त्याला उत्तर आले नाही. त्यामुळे मी राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला ठेवण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ प्राणांतिक उपोषण करणार आहे.

Anna Hazare
धक्कादायक : 35 माजी सरपंचांची होतेय तुरूंगात रवानगी; ZP च्या सीईओंनी काढले आदेश

राज्याच्या वाईन विक्री धोरणाविरोधात भाजपही आक्रमक झाली आहे. या निर्णय मागे घेण्याची मागणी केली जात आहे. तर सरकारमधील अनेक मंत्र्यांनी वाईन ही दारू नसल्याचे सांगत निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यामुळे यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हजारे यांनीही राज्य सरकारला निर्णय मागे घेण्याची विनंती केली. पण अद्याप त्यावर निर्णय न झाल्याने त्यांनी १४ तारखेपासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात हजारे काय म्हणाले?

युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. तीच राज्य आणि राष्ट्र घडवू शकेल. तरूण पिढी ही खरी देशाची संपत्ती आहे. त्यातूनच उद्याचे महापुरूष तयार होणार आहेत. मात्र सरकारच्या सुपरमार्केट वाईन विक्रीच्या निर्णयामुळे युवाशक्तीवर काय परिणाम होईल याचा सरकारने विचार केलेला नाही. फक्त मिळणाऱ्या महसुलाचा विचार केलेला दिसतो. ज्या सत्तेमध्ये समाज, राज्य, राष्ट्र हिताचा विचार नसेल अशी सत्ता काय कामाची? ज्यांनी राज्य चालवायचे आहे त्यांनी जनतेचा सल्ला न घेता आपल्या मनाला वाटेल असे निर्णय घेणे म्हणजे लोकशाही नव्हे असेही हजारे यांनी पत्रात म्हटले होते.

वाईन समाजाला घातक आहे. हे छोटा मुलगा सुद्धा सांगू शकेल. परंतू राज्य चालविणाऱ्यांना कळू नये हे दुर्दैवी आहे. आमच्या गावात ५० वर्षांपूर्वी ३५ दारूभट्ट्या होत्या. गेली २२ वर्षांत गावात विडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा सुद्धा मिळत नाही. राज्य सरकार मात्र सुपरमार्केट आणि किराणा दुकानात वाईन ठेवण्याचा निर्णय घेते हे मोठे दुर्दैव आहे. हा निर्णय भावी पिढ्यांसाठी घातक असल्याने मी या सरकारचा निषेध करण्यासाठी प्राणांतिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र कार्यकर्त्यांनी माझ्या प्रमाणे उपोषण करू नये. राज्यातील अनेक संस्था व संघटनांनी वाईनच्या निर्णया विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच पक्षविरहित समाज, राज्य आणि राष्ट्र हिताचा विचार करून अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी व आंदोलनाची दिशा ठविण्यासाठी राज्यात विभागवार बैठक आयोजित करणार आहे, असा इशाराही हजारे यांनी पत्रातून दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com