अहमदनगर : पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून पिंपळनेर येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना एकाच व्यासपीठावर बोलावण्यात आले होते. मात्र अण्णा हजारेंनी या कार्यक्रमाला जाणे टाळले तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी राळेगण सिध्दी जवळून जाऊनही अण्णांना भेटणे टाळले. त्यामुळे हा कार्यक्रम आज चर्चेचा विषय ठरला. Anna Hazare did not go there as Ajit Pawar came ...
पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे संत निळोबाराय यांच्या अभंगगाथा व त्यांच्या राहत्या वाड्याचा जीर्णोद्धार कामाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्याचे आमदार लंके यांनी निश्चित केले होते. त्यासाठीची फलकेही विविध ठिकाणी लावली. तसेच सोशल मीडियावरूनही याची प्रसिद्धी केली. पिंपळनेर हे राळेगणसिध्दी लगतचे गाव आहे, असे असूनही अण्णा हजारे यांनी कार्यक्रमाला येणे टाळले.
या कार्यक्रमाला अजित पवारांसह राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार नीलेश लंके, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, पंचायत समितीच्या उपसभापती सुनंदा धुरपते, निळोबाराय देवस्थान समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव माऊली पठारे, कार्याध्यक्ष अशोक सावंत, निळोबारायांचे वंशज गोपाळ मकाशीर, सरपंच सुभाष गाजरे यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख देवस्थानचे सर्व पदाधिकारी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडीतील नेत्यांवर सध्या भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. शिवाय शिखर बँक घोटाळा प्रकरणाबाबत अण्णा हजारे यांनी अजित पवारांवर गैरव्यवहाराचे आरोप केले होते. पवार कुटूंबीय व अण्णा हजारे यांचे संबंध कधीही मधूर राहिलेले नाहीत. हजारेंनी पवार कुटूंबीयांवर नेहमीच टीका केली आहे. त्यामुळे अण्णा हजारे कार्यक्रमाला आले नसल्याची चर्चा आहे. यातच महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनीही राळेगणसिद्धीतून जाऊनही अण्णा हजारेंची भेट टाळणेच पसंत केले आहे. आमदार नीलेश लंके यांचे कार्यकर्ते अण्णा हजारे व अजित पवार एकाच व्यासपीठावर दिसणार असे कालपर्यंत ठामपणे सांगत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.