Mumbai News : कोल्हापूरमध्ये काल वेगळीच राजकीय घडमोड झाली. कोल्हापूरच्या उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी ऐनवेळी निवडणुकीत माघार घेतली. या निर्णयावर काँग्रेस नेते सतेज पाटील चांगलेच संतापले होते. यानंतर कोल्हापुरात बऱ्याच घडमोडी झाली.
एका सभेत तर सतेज पाटलांना आपल्या भावना अनावर झाल्या आणि त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या सभेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये सतेज पाटील यांच्या टोपण नाव, बंटी असा उल्लेख केला आहे. त्यात म्हटले आहे की, 'बंटी, माझं तुला एकच सांगणं आहे. तुझे अश्रू वाया जणार नाहीत. कोल्हापूरची जनता सुजाण आहे. तुझ्या लढाईतील मेहनतीचे चीज हे स्वतः कोल्हापूरकरच करतील', असे म्हटले आहे.
सतेज पाटील ऊर्फ बंटी यांच्या हळवेपणाचा देखील जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केले आहे. "बंटी पाटील हा कोल्हापूरचा रांगडा गडी, पण मनाने किती हळवा आहे! त्याने काल अश्रूंना वाट करून दिली. या त्याच्या अश्रूंमध्ये काँग्रेस (Congress) विचारांबद्दलचं निस्सिम प्रेम आणि महाविकास आघाडीला जिंकवण्यासाठीची जिद्द स्पष्ट दिसत होती. त्याच्या रडण्यात कुठलाही राजकीय क्लेष नव्हता, तर आपण हकनाक एक जागा गमावली याचं आतीव दुःख होतं", असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. 'पक्ष मजबूत करण्यासाठी अशी हक्काची कार्यकर्ते हवेत. यामुळे पक्ष तळागाळात भक्कमपणे उभा राहतो', असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी ऐनवेळी निवडणुकीत माघार घेतली. या निर्णयामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील चांगलेच संतापले होते. यामुळे सतेज पाटील आणि शाहू महाराज छत्रपतींमध्ये वाद सुरू असल्याची चर्चा सुरू झाली. अर्ज माघारी घेतेवेळी संतापलेले सतेज पाटील यांनी चढ्या आवाजात काही गोष्टी सुनावल्या. मात्र थोड्यावेळानंतर त्यांनी महाराजांची माफी देखील मागितली.
सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या तातडीच्या बैठकीत भूमिका स्पष्ट केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शाहू महाराजांविषयी अत्यंत आदर असल्याची प्रतिक्रिया दिली. गाडीचा सन्मान ठेवण्याची भूमिका आहे आणि पुढेही राहणार आहे. तसेच या विषयावर पडदा पडल्याचे जाहीर केले. विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडीसाठी एकत्र राबू, असे देखील सतेज पाटील यांनी जाहीर केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.