महेश माळवे
श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) : श्रीरामपूर नगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. श्रीरामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी 'बाकी समय बलवान हैं' म्हणत नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीतील राजकारणाविषयी जास्तीचे भाष्य करणे टाळले. ( Avinash Adik said, the rest of the time is strong ... )
माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या संपर्क कार्यालयात शेतकरी संघटना व मराठा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी यांनी आपल्या ज्येष्ठ भगिनी अनुराधा आदिक यांच्याबद्दल आदरयुक्त भीती व्यक्त करत लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घ्यायचे आहेत. मात्र, कार्यक्रम ताईंचा असल्याने त्याच याची रूपरेषा ठरवणार असल्याचे अजित पवार यांना सांगितले असता त्यांनीही ते मान्य करत त्यांनाच ठरवू द्या, अशी प्रतिक्रिया दिल्याचे सांगताच एकच हशा पिकला.
ते पुढे म्हणाले की, पाच वर्षे अनुराधाताईंनी पालिकेत सत्ता असताना पारदर्शक कारभार केला. पालिकेतील संपर्क कार्यालय अनेक 'माजींनी' मागितले, परंतु ते दिले नाही. तसेच स्वतः अनुताईंनीही ते कधी उघडले नाही. त्यामुळे चावी त्यांच्या पर्समध्ये असतानाही आपण ती मागण्याची हिंमत केली नाही. तसेच नवीन संपर्क कार्यालयामुळे काँग्रेस भवनकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, अशी अपेक्षा व्यक्त केली.
श्रीरामपूर नगरपालिके समोरील नवीन झालेल्या संपर्क कार्यालयातून उठून समोर पालिकेत बसायचे असल्याचे अनेकजण ताईंना सांगतात. त्यांच्या पाच वर्षांचा कारभार पाहून आपणही त्यांना पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करत 'बाकी समय बलवान हैं' म्हणात आगामी राजकारणाविषयी अधिक भाष्य त्यांनी टाळले. मात्र विरोधकांना नेमकं काय म्हणायचं ते यातून सूचित केले.
आपण दोन दिवस आल्याने काहींना ती चमकोगिरी वाटते. मात्र, आपले व्यक्तिमत्त्वच तसे असल्यामुळे आपण चमकतो. तसेच रामनवमीनिमित्त रामाचे दर्शन घेतले तरी काहींच्या पोटात दुखते, असा टोलाही त्यांनी कोणाचे नाव न घेता यावेळी लगावला.
यावेळी अविनाश आदिक यांच्या हस्ते माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांचे 60 हजार रुपयांचे मानधन मराठा प्रतिष्ठानच्या सभागृहाला देण्यात आले. तसेच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी 16 तारखेला होणाऱ्या ऊस परिषदेचे निमंत्रण त्यांना दिले. यावेळी मराठा प्रतिष्ठानचे मनोज नवले, सुनील साठे, विठ्ठल पवार, रावसाहेब तोडमल, राजेंद्र मोरगे, जयंत चौधरी, सोनल मुथा आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.