सोलापूर : ' राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) आहे. वरिष्ठ पातळीवर युती झाली आणि पक्षश्रेष्ठींनी तसे आदेश दिले, तर स्थानिक पातळीवरही युती होऊ शकते. महाविकास आघाडी सोबत येऊन एकत्रित लढली तर ठीक, अन्यथा आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवू,' असे म्हणत सोलापूरचे राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ आमदार बबन शिंदे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
सोलापूरात (Solapur) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आमदार बबनदादा शिंदे (Babandada Shinde) यांनी मोठं विधान केलं आहे. माढा तालुक्यातील वडाचीवाडी येथे ऑक्सिजन पार्कच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघातून बबन शिंदे हे राष्ट्रवादीचे आमदार (Madha NCP MLA) आहेत. 1995 पासून बबन शिंदे यांनी सलग सहा वेळा आमदारपद भुषवले आहे. त्यापैकी पाच वेळा त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर बाजी मारली आहे.
विशेष म्हणजे, माढा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर बबन शिंदे यांचे एकहाती वर्चस्व आहे. एकहाती सत्ता हाती असतानाही त्यांनी युती झाली तर सोबत जाऊ, नाही तर स्वतंत्रपणे निवडणुक लढू, अशी भूमिका घेतल्याने शिंदे यांच्या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. माढा पंचायत समिती कार्यालयाच्या जवळपास 4 कोटी रुपयांच्या निधीतून उभा केलेल्या इमारतीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. दरम्यान, माजी आमदार आणि सहकार महर्षी विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभास आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पक्ष प्रमुख शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निमंत्रण दिले असल्याची माहिती आमदार बबन शिंदे यांनी यावेळी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.