श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) - बेलवंडी येथील भैरवनाथ सेवा संस्थेची निवडणूक नुकतीच झाली. ही सेवा सोसायटीवर स्थापनेपासून अण्णासाहेब शेलार यांचे वर्चस्व आहे. अण्णासाहेब शेलार हे विखे गटाचे मानले जातात. शेलारांनी माजी आमदार राहुल जगताप यांची मदत घेत नागवडे गटाचा पराभव केला. नागवडे मागील महिन्यातच आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाच्या ताब्यात असलेली काष्टी सोसायटीवर सत्ता मिळविली होती. त्याच विजयाची पुरावृत्ती करण्यासाठी निघालेल्या नागवडे गटाला अण्णासाहेब शेलार यांनी राहुल जगताप यांच्या मदतीने रोखले. ( Belwandi fort maintained by Annasaheb Shelar: Nagwade group defeated with the help of Rahul Jagtap )
संस्थेच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या गटाने सर्व तेरा जागा जिंकत विरोधी नागवडे गटाचे पानीपत केले. जवळपास एक हजार मतांचा दोन्ही गटांत फरक राहिला. या निवडणुकीत नागवडे गटाच्या प्रमुखांनी जातीने लक्ष घातले होते. मात्र बेलवंडीकरांनी अण्णासाहेब शेलार यांचेच नेतृत्व मान्य केले. माजी आमदार राहुल जगताप यांनी शेलार यांना केलेली मदत महत्वाची ठरली.
शेलार यांचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी मोठी यंत्रणा लावली होती. शेलार यांना राष्ट्रवादीचे माजी आमदार राहूल जगताप यांची मदत असल्याने निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष होते. शेलार यांच्यासाठी गावचे नेते सुभाष काळाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लावलेली फिल्डींग महत्वाची ठरली. नागवडे कारखान्याचे संचालक सावता हिरवे यांच्या हाती सुत्रे देत नागवडे गटाने शेलार गटाच्या पराभवासाठी ताकत लावली. मात्र निकालात मतदारांनी शेलार यांनाच सत्ता दिली.
शरद इथापे, विजय काळाणे, बापू घोडेकर, अश्रू डाके, जयसिंग लबडे, सुखदेव लाढाणे, ज्ञानदेव शेलार, गंगाराम हिरवे, स्वाती लबडे, अनिता वैद्य, साहेबराव शेलार, नामदेव साळवे, संतोष वाघमोडे यांनी विजय मिळवला.
शेलार यांना टॉनिक
बेलवंडी ग्रामपंचायतीत बहुमत आहे, मात्र सरपंच विरोधी आहेत. नागवडे कारखाना निवडणुकीतही पराभव झाल्याने अण्णासाहेब शेलार यांचे समर्थक अस्वस्थ होते. त्यामुळे ही निवडणूक ते जिंकण्यासाठीच लढले. याउलट शेलार यांचे राजकारण संपविण्यासाठी विरोधकांनी टाकलेले फासे उपयोगी ठरले नाहीत. या विजयाचे टॉनिक शेलार यांना जिल्हा परिषदेसाठी उपयोगी ठरणार आहे.
सभासद व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. वांगदरीवरुन पैशाचा पूर आला मात्र लोकांनी त्यांना नाकारले. निवडणुकीत फक्त पैसे असून उपयोग नाही लोकही सोबत लागतात याची जाणीव विरोधकांनी ठेवावी.
- अण्णासाहेब शेलार, माजी उपाध्यक्ष, अहमदनगर जिल्हा परिषद
विरोधकांचे राजकारण हा व्यवसाय आहे. सत्तेच्या माध्यमातून कमाविलेला पैसा निवडणुकीत वापरुन त्यांनी विजय घेतला. काही भावनिक मुद्दे करताना लोकांना भुरळ घातली. आम्हाला पराभव मान्य असून भविष्यात संघर्ष सुरुच ठेवू.
- सावता हिरवे, संचालक, नागवडे कारखाना.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.