सातारा ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'मारहाण' करण्याची धमकी दिल्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना अटक करावी, अशी मागणी सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाने केली आहे. या बाबतची तक्रार भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार यांनी सातारा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्याकडे लेखी स्वरूपात दिली आहे.
सातारा जिल्हा भाजपने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, देशाचे पंतप्रधान हे भारतीय राज्य घटनेनुसार सर्वोच्च पद आहे. त्यांची सुरक्षितता हा सर्व भारतीय व सुरक्षा यंत्रणांचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कोणतेही गैरविधान, गैरकृत्य हे देशाच्या तसेच सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षेविषयी उचललेले विरूध्द पाऊल असते. अशा नेत्याविषयी जाणीवपूर्वक अपशब्द वापरणे, त्यांना मारहाण करण्याची भाषा वापरणे, त्यांच्या हत्तेचा कट रचने या सर्व बाबी देशद्रोहाच्या गुन्ह्यात मोडतात.
काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल (सोमवारी) भंडारा येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशुन, मी मोदीला मारू शकतो', शिव्याही देऊ शकतो, असे असंसदीय, गुन्हेगारी प्रवृत्तीचे व पंतप्रधानांना शारिरीक इजा पोचविण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांना हाताशी धरून कटकारस्थान रचल्याचे स्पष्ट होत आहे. तक्रारीत म्हटले की, काँग्रेस पक्षाच्या प्रदेश पातळीवरील सर्वोच्च पदावर विराजमान असताना आपल्या जबाबदारीचे व नैतिक निती मुल्यांचे भान विसरून नाना पटोले यांनी केलेले हे वक्तव्य दंडनीय अपराधातील आहे.
तक्रारीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील कारवाईचा उल्लेख करून म्हटले की, राज्याचे पोलिस खाते हे सजग व कृतीशील आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांच्याविषयी काढलेले कथित अनुद्गारावरून विविध पोलिस ठांण्यात राणे साहेबांविरूध्द पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य व देशाच्या अंतरिक सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन नाना पटोले यांच्या विरूध्द कायदेशीर कारवाई करावी व त्यांना अटक करावी, असे तक्रारीत म्हटले आहे.
यावेळी भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. प्रशांत खामकर, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन साळुंखे, भटके विमुक्त महिला जिल्हाध्यक्ष सौ. प्रिया नाईक, शहर उपाध्यक्ष नितीन कदम, शहर चिटणीस रवी आपटे, उद्योजक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमोल टंकसाळे, युवा मोर्च्या शहराध्यक्ष विक्रम बोराटे, ओबीसी मोर्चाचे अविनाश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.