पंढरपूर : भारतीय जनता पक्षाच्या (bjp) विशेषतः मोहिते पाटील (mohite patil) समर्थक नगरसेवकांमध्ये माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदावरून दोन गट पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (ncp) सत्तेची आयती संधी चालून आली. भाजपचे डॉ. अप्पासाहेब देशमुख यांनी राष्ट्रवादी आणि अपक्षांच्या मदतीने नगराध्यक्ष पटकावले, तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे शिवाजी देशमुख यांची निवड झाली. विशेष म्हणजे दोन वर्षे उपनराध्यक्ष आणि दीड वर्षे नगराध्यक्षपदही राष्ट्रवादी-अपक्षांना मिळणार आहे. खुद्द नगराध्यक्ष डॉ. देशमुख यांनीच निवडीनंतर ही माहिती दिली. (BJP-NCP alliance in Malshiras council chairman election)
माळशिरस नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ जागांपैकी १० जागा जिंकत भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळविले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांना सात जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे नगराध्यक्ष भाजपचा नगराध्यक्ष होणार, हे निश्चित होते. मात्र, नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण निघाल्यानंतर मात्र भाजपमध्ये दोन गट पडले.
भाजपमधील एका गटाने अपक्षांशी संधान साधल्यानंतर नाराज झालेले भाजप नेते डॉ. अप्पासाहेब देशमुख यांनी राष्ट्रवादी आणि अपक्षांची मोट बांधली आहे. राज्याच्या राजकारणात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष असताना सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या माळशिरस नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र या दोन्ही पक्षाने मिळून सत्ता स्थापन केली आहे. विशेष म्हणजे या नव्या राजकीय प्रयोगाला दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सहमती दर्शविली आहे, त्यामुळे येत्या काळात असे नवे राजकीय प्रयोग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नव्या युतीमुळे माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपचे अप्पासाहेब देशमुख, तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे शिवाजी देशमुख यांची निवड झाली. नव्या युतीमुळे मोहिते-पाटील यांच्या बालेकिल्ल्यात आता नवा भाजप आणि राष्ट्रवादी असा राजकीय प्रयोग आकाराला आला आहे. या नव्या आघाडीचा फायदा भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला आहे. कारण, अवघ्या दोन जागा असताना राष्ट्रवादीच्या पदरात उपनराध्यक्षपद पडले आहे. ते दोन वर्षांसाठी पक्षाकडे असणार आहे. तसेच, दीड वर्षासाठी नगराध्यक्षपदही मिळणार आहे. भाजपकडे मात्र साडेतीन वर्षे नगराध्यक्ष, तीन वर्षे उपनराध्यक्षपदाबरोबरच विषय समित्या मात्र पाच वर्षे असणार आहे, खुद्द नगराध्यक्ष डॉ. देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी-अपक्षांची आघाडी पाच वर्षे आम्ही व्यवस्थित चालवू. त्यात कोणतीही अडचण येणार नाही. महाविकास आघाडी सरकारप्रमाणे नगरपंचायत चालवणार का, त्यावर नगराध्यक्ष नानासाहेब देशमुख म्हणाले की तुम्ही कसंही म्हणा. मात्र आम्ही शंभर टक्के पाच वर्षे या आघाडीच्या माध्यमातून कारभार पाहणार आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.