इस्लामपूर : निशिकांत पाटील यांनी जयंत पाटलांना अक्षरशः धारेवर धरले...

NCP | Jayant Patil | BJP | Nishikant Patil : दुसऱ्यांनी उभ्या केलेल्या संस्था ताब्यात घेणे किंवा बंद पाडणे, हा एकमेव कार्यक्रम
Jayant Patil | Nishikant Patil
Jayant Patil | Nishikant PatilSarkarnama

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात दुसऱ्यांनी उभ्या केलेल्या संस्था ताब्यात घेणे किंवा बंद पाडणे, हा एकमेव कार्यक्रम राबवला जातो. वारसाने मिळालेल्या संस्थांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांनी विधायक नव्हे, विघातक राजकारणाची परंपरा सुरू केली आहे. त्यांना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी ‘नाही रे’ वर्गातील सर्वांना एकत्र करून यापुढची वाटचाल करणार आहे, अशी घोषणा करत आज माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (Nishikant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना अक्षरशः धारेवर धरले.

निशिकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील राजारामबापू नाट्यगृहात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शैलजा पाटील, ज्येष्ठ नेते रघुनाथराव पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, पृथ्वीराज पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील गावोगावचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Jayant Patil | Nishikant Patil
अखेरच्या टप्प्यात चुलत्याने दिलेली साथ समाधान आवताडेंसाठी निर्णायक ठरणार

निशिकांत पाटील म्हणाले, ‘‘जे स्वप्नातही पाहिले नाही, ते गेल्या अडीच वर्षांत या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी अनेक लोकांना दिलेल्या त्रासातून बघायला मिळाले. तालुक्यात विधायकऐवजी विघातक प्रवृत्ती वाढवली. ज्यांनी बोटाला धरून राजकारणात आणले, त्या लोकांच्या कुटुंबाला अडचणीत आणले. कोरोना काळात हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही हजारो रुग्णांवर उपचार केले. मात्र केवळ राजकीय सूडबुद्धीने आमच्या डॉक्टरांसह इतरांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले. २०० पोलिस घेऊन हॉस्पिटलमध्ये दहशत निर्माण केली.

मात्र जयंत पाटील यांनी हा जिल्हा क्रांतिकारक, सहकारधुरिणांचा आहे, याचा विसर पडू देऊ नये. संस्था निर्माण करणाऱ्यांना काय त्रास होतो, हे त्या उभ्या करणाऱ्यालाच माहीत असते. आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्यांनी संस्था ताब्यात घेऊन आपले कुटिल राजकारण करू नये. माजी आमदारांनी उभा केलेला सर्वोदय कारखाना हिसकावून घेतला, किती ही भूक? जाताना घेऊन जायचे नाही, इथेच ठेवायचे आहे, याचा विसर पडू देऊ नका, असा संतापही निशिकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Jayant Patil | Nishikant Patil
निवडणूक शपथपत्रातील तफावत मुख्यमंत्री शिंदे यांना भोवणार? न्यायालयाचे चौकशीचे आदेश

साधी मुस्काटात मारली तरी प्रशासनाच्या जीवावर गंभीर कलमे लावून अडकवण्यात आले, का तर तो वेगळ्या पक्षाचा आहे. आपल्या या असल्या विघातक प्रवृत्तीमुळे तालुका व जिल्हा मागे राहिला आहे. राजकारणापलीकडे विकासाचा दृष्टिकोन संपल्यामुळे आजपासून सामान्यातील सामान्य माणूस एकत्र येऊन काम करूया, असा निर्धारही पाटील यांनी बोलून दाखविला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com