
उमेश महाजन
Solapur, 17 February : सोलापूरचे पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच कुजबूज सुरू झाली होती. विशेषतः माढ्याचा गड पुन्हा जिंकण्यासाठी मोहिते पाटील यांच्या वर्चस्वाला वेसन घालण्यासाठी गोरे यांच्या खांद्यावर सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, अशी चर्चा रंगली होती. त्यावर आता खुद्द जयकुमार गोरे यांनी सोलापूरला मला पक्षश्रेष्ठींनी विचारपूर्वक पाठवले आहे, ते काम मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही’ असे स्पष्ट केले आहे, त्यामुळे सोलापुरात विशेषतः माढ्यात पुन्हा एकदा शह-कटशहाचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.
सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथे आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उजनीतून सांगोला तालुक्यातील २२ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या (स्व.) बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात जयकुमार गोरे (Jaykumar Gore) बोलत होते.
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री (Solapur Guardian Minister) भारतीय जनता पक्षाने फार विचारपूर्वक केले आहे. पक्षश्रेष्ठींनी माझ्या खांद्यावर सोपवलेली कामे पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. सोलापूर जिल्ह्यात विकासाची आणि पक्षाचीही घडी पुन्हा बसवायची आहे. म्हणजेच माढ्यात लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचा खासदार करण्यासाठीच ही नेमणूक असल्याचे गोरे यांनी अप्रत्यक्ष स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पालकमंत्रिपदाची नेमणूक झाल्यानंतर पुण्यातील आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलतान गोरे यांना मोहिते पाटील यांचा बंदोबस्त करण्यासाठी तुमची सोलापूरला नेमणूक केली आहे, असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी कोणाचाही बंदोबस्त करण्यासाठी माझी नेमणूक झालेली नाही. उलट सर्वांना बरोबर घेऊन मी काम करणार आहे, असेही गोरे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांचा आजचा इशारा विशेष महत्वपूर्ण मानला जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील वाळू माफियांनाही जयकुमार गोरे यांना जोरदार इशार दिला आहे. वाळूतस्करांची दादागिरी, मस्ती मी जिल्ह्यात चालू देणार नाही. जे अधिकारी वाळू माफियांना पाठीशी घालतात, त्यांच्यावरही कारवाई करायला मागेपुढे बघितले जाणार नाही. वाळूमाफियांना कारवाई करताना कोणताही राजकीय दबावही मानला जाणार नाही, असेही जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.