

Solapur, 26 October : काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनाला आता भारतीय जनता पक्षाकडूनही आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर देण्यात येणार आहे. त्यासाठी भाजप नेतृत्वाने ‘लोकतंत्र बचाव आणि अराजकता हटाव’ अशा पद्धतीचे अभियान देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
दरम्यान, येत्या 4 नोव्हेंबरला भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे आंदोलन सोलापुरात होणार आहे. या मोर्चासाठी पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आणि 25 ते 30 हजार लोक याठिकाणी येतील, असा दावाही गोरे यांनी केला आहे.
सोलापूर शहरात पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री गोरे यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, देशातील लोक तांत्रिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. त्यांच्या बाजूने निकाल दिला, तर न्यायालय निरपेक्ष भावनेने काम करते, असं ते सांगतात आणि विरोधात निकाल दिला तर न्यायव्यवस्था चुकीच्या पद्धतीने काम करते, असं नरेटिव्ह पसरवलं जातं आहे.
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढून न्याय व्यवस्थेवर दबाव आणण्याचं काम काँग्रेसकडून केला जात आहे. लोकशाहीने निवडून दिलेली विरोधी पक्षाचे राज्य काँग्रेसने बरखास्त केली होती, त्यासोबतच आणीबाणी आणून देशाची व्यवस्था बदलण्याचे काम काँग्रेसने केले आहे, असा आरोपही गोरे यांनी केला.
पालकमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या 13 वर्षांपासून देशातील दळणवळण व्यवस्था उभी केली आहे. जगातील तिसरी सर्वात मजबूत अर्थव्यवस्था म्हणून सामोरं आली आहे. संरक्षण क्षेत्रात भारत आज स्वयंपूर्ण झालेला आहे. प्रचंड मोठी औद्योगिक क्रांती देशात झाली आहे. 2047 चा विकसित भारतासाठी मोदी काम करत आहेत.
देश अस्थिर करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याला साथ देण्याचं काम काँग्रेस आणि विरोधी पक्ष करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतील तरतुदी यांना मान्य नाहीत. निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचा राजीनामा घेण्याचा अधिकार सरकारला नाही, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, जे लोक या देशाचे नागरिक नाहीत किंवा जे बांगलादेशी आहेत, अशा लोकांची नावं मतदार यादीतून वगळली जात आहेत. एसआयआरची (SIR) प्रक्रिया सुरु असताना प्रत्येक पक्षाने प्रत्येक बूथवर BLA ची नेमणूक केली पाहिजे. माहितीच्या अधिकारात माहिती मागा. कुठल्या पक्षाने किती BLA ची नेमणूक केली आहे. भाजपने 100 टक्के BLA ची नेमणूक केली आहे, काँग्रेस किंवा विरोधी पक्षांनी BLA ची नेमणूक केली नाही. फक्त जंतरमंतरवर डफली वाजवून सरकारवर टीका करण्याचं काम सुरू आहे.
नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश या ठिकाणी अराजकता पसरावून सत्ताबदल झाला आहे. पण, भारतात विरोधक यशस्वी झालेले नाहीत. कारण जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यात विरोधकांना लोकांनी नाकारलं आहे. घटनेवर जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं, तेव्हा त्याच रक्षण करणे हे देशाचा नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांची मानसिकता त्यांनी केलेल्या वक्तव्यातून येत आहे, त्यांना नैराश्य आलेलं आहे. परदेशी शक्तीच्या माध्यमातून त्यांना ताकद मिळत आहे, त्यातून आपणाला सत्ता आणता येते का, या साठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. विरोधी पक्षाने दिल्लीत आंदोलन करून कसे जनजीवन बिघडवले, हे आपण पहिले आहे. मात्र, आमचा मोर्चा तसा नसेल. त्यांचा त्यांच्या वडिलांवर विश्वास नाही, त्यांनी मोदींना त्यांच्या वडिलांकडून समजून घ्यावे, असा टोला गोरे यांनी प्रणिती शिंदे यांना लगावला.
विरोधकांचा भारताच्या राज्यघटनेवर विश्वास नाही. हे फक्त घटना हातात घेत नाहीत, त्याच्या आतमध्ये काय आहे, हे वाचत नाहीत. भारताचा सर्वभौमत्व धोक्यात नाही. पण, विदेशी शक्तीच्या माध्यमातून धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप जयकुमार गोरे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.